बारामती - पुणे पदवीधर मतदार संघातून डॉ.श्रीमंत कोकाटे यांची उमेदवारी संभाजी ब्रिगेडकडून कायम ठेवण्यात आली आहे. कोकाटे हे एक योग्य उमेदवार आहेत. म्हणूनच त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी शुक्रवारी बारामतीत दिली.
कोकाटे हे बहुजन समाजाचे प्रतिनिधी-
गायकवाड पुढे म्हणाले की, डॉ श्रीमंत कोकाटे हे पदवीधर मतदारसंघासाठी अत्यंत योग्य उमेदवार आहेत. राजकीय पक्षांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ढवळाढवळ केली आहे. ती योग्य नाही. तसेच ही निवडणूक विधान परिषदेची वा राजकीय निवडणूक नाही. त्यामुळे या निवडणुकीला कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह नाही. डॉ. श्रीमंत कोकाटे हे बहुजन समाजाचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे ते निवडून येतील, असा मला विश्वास आहे. आपल्या घटनाकारांनी निवडणुका संदर्भात लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद अशी विभागणी केली आहे. त्यात राज्यसभा आणि विधान परिषदेत वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ व बुद्धिजीवी वर्गातले लोक असतात.
गायकवाडांनी राजकीय पक्षांचा केला निषेध-
पदवीधर मतदारसंघाबाबत बोलताना गायकवाड म्हणाले की, पदवीधर मतदारांचे अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत. चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे मोफत नसले तरी माफक शिक्षण मिळायला पाहिजे. तसेच पदवीधर झाल्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. हे प्रश्न मांडणारे लोक आवश्यक आहे. मात्र भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने जे उमेदवार दिले आहेत. ते साखर सम्राट आहेत. तसेच विधानसभा लढवले लोक आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या महत्त्वाच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण येत आहे. त्याचा मी निषेध करत असल्याचेही गायकवाड म्हणाले.