पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे साथीदार सुधीर पाटकर यांच्या मालमत्तेवर ईडीकडून आज पुण्यात छापेमारी करण्यात आली. यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी काय कारवाई केली जात आहे त्याबद्दल मला माहित नाही. पण, मी नक्की सांगू शकतो की मुंबई महापालिकेत कोविड सेंटर सुरू झाले, तेव्हा मोठा भ्रष्टाचार बाहेर आला. त्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला होता.
नागरिकांच्या जीवाशी खेळ : कोविडच्या काळात कोणतीही माहिती नसताना कंपन्या सुरू झाल्या. लोकांच्या जीवाशी खेळ झाला. त्याबाबत तपास सुरू आहे. या छाप्यात काय सापडले याचा खुलासा ईडी करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर असून, शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
आदित्य ठाकरे यांच्या मित्रावरही ईडी छापे : शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मित्रावरही ईडी छापे टाकत आहे. याबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, ज्यांचे कनेक्शन आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याबाबतची सविस्तर माहिती ईडीकडून दिली जाणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
लोकप्रतिनिधींनी संयम बाळगण्याची गरज : यावेळी फडणवीस यांनी गीता जैन मारहाण प्रकरणी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी संयम बाळगण्याची गरज आहे. काही वेळा राग व्यक्त करता येतो, हे ठीक आहे. मात्र, एखाद्या गोष्टीवर राग व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. लोकप्रतिनिधींनी संयम बाळगून कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन फडणवीस यांनी केले आहे.
हेही वाचा - MLA Geeta Jain : आमदार गीता जैन यांनी मनपा अभियंत्याच्या लगावली कानशिलात, निलंबित करण्यासाठी दिले पत्र