पुणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत एवढे बिनडोक आरोप करतात की काय उत्तर द्यायचं? अस म्हटले आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वक्तव्य केल आहे. जगभरातील अकलेचा जेवढा ठेवा आहे, तो फडणवीस साहेबांच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीस साहेब सगळ्यात विदवान माणूस आहे असा टोला यावेळी अंधारे यांनी फडणवीस यांना लगावला आहे.
संजय राऊतांना अडचणीत आणण्याचे काम : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुण्यातील लोहिया नगर येथे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री यशोमती ठाकूर, यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. यावेळी अंधारे म्हणाल्या की संजय राऊत हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे. तसेच ते हडाचे पत्रकार आहे. त्यामुळे ते कुठलंही विधाने हे इतक्या सहज आणि उथळपने करणार नाही. शिवसेनेचा मुख्य आधारस्तंभ म्हणून संजय राऊत यांच्याकडे बघितल जाते. याचमुळे भाजप आणि शिंदे गट त्यांना अडचणीत आणण्याचे काम करत आहे.
संजय राऊतांच्या जीवाला धोका : याआधी देखील ईडीच्या बाबतीत त्यांना अडकवून अस्थिर करण्याचे काम शिंदे फडवीस यांनी केले आहे. आत्ता सुद्धा राऊत यांच्या जिवाला धोका निर्माण करणे हा प्रयत्न असू शकतो. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, ते एका पक्षाचे गृहमंत्री नसून संपूर्ण राज्याचे गृहमंत्री आहे. त्यामुळे त्यांनी राज्याचे गृहमंत्री सारखे वागत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी देखील यावेळी अंधारे यांनी केली.
काय म्हणाले फडणवीस : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असताना त्यांना संजय राऊत यांच्या बाबतीत विधान केले आहे. संजय राऊत यांना विनाकारण प्रसिद्धीची सवय लागली आहे. विनाकारण कुठला तरी आरोप करायचा आणि प्रसिद्धीत राहायचे हि त्यांची सवय झाल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांनी २ हजार कोटींचा आरोप केला, त्याचा एकही पुरावा त्यांच्याजवळ नाही. अलिकडे संजय राऊत एवढे बिनडोक आरोप करतात की काय उत्तर द्यायचे? रोज खोटे बोलल्याने सहानुभूती मिळत नसल्याची खोचक टीका देखील फडणवीसांनी केली होती. चुकीचे आरोप लावल्याबद्दल संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली जाईल असे मला वाटत असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - Sanjay Raut Supari Allegation : ठाण्यात शिजली संजय राऊतांच्या हत्येची खिचडी! वाचा संपूर्ण प्रकरण