पिंपरी-चिंचवड- पिंपरी-चिंचवड परिसरातील देहूरोड येथे 1954 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापन केली होती. त्या ऐतिहासिक घटनेला शुक्रवारी 25 डिसेंबरला 66 वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 66 वा वर्धापन दिन हा साधेपणाने व मर्यादित व्यक्तीच्या उपस्थितीत पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी देखील देहू रोड येथे 25 डिसेंबरला गर्दी न करता, घरूनच सोशल मिडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रंगून येथे जागतिक परिषदेत भेट म्हणून मिळालेली, भगवान गौतम बुद्धांची मूर्ती देहूरोड येथे 25 डिसेंबर 1954 साली स्थापन केली होती. याच घटनेला 66 वर्ष पूर्ण होत असून, यावर्षी मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी देहू रोड येथील धम्मभूमीवर लाखोंचा भीमसागर एकवटतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिनावर निर्बंध आले असून, नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
24 आणि 25 डिसेंबर रोजी असणार जमावबंदी
यावेळी पोलीस उपायुक्त भोईटे म्हणाले की, ऐतिहासिक धम्मभूमी येथे 66 वा वर्धापन दिन पार पडणार आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 24 आणि 25 डिसेंबर रोजी या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा वर्धापन दिन अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. तसेच या दिवशी सेंट्रल चौक ते निगडी उड्डाणपूल हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून रावेत मार्गे वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान देहू रोड येथील ऐतिहासिक बुद्धविहार येथे लाखो नागरिक येतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि प्रशासनाला सहकार्य करण्याच्या भावनेतून नागरिकांनी कार्यक्रमासाठी येऊ नये असं आवाहन बुद्ध विहार ट्रस्ट मार्फत करण्यात आले आहे.