पुणे - खेड तालुक्यातील चिखलगाव गावात आज दुपारच्या सुमारास महिलेसह दोन चिमुकल्या मुलींचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या मायलेकींची आत्महत्या की हत्या याबाबत अद्याप संभ्रम असून राजगुरुनगर पोलीस तपास करत आहेत. सुरेखा उत्तम गोपाळे (२८) तृप्ती गोपाळे (४) धनश्री गोपाळे (७) असे विहिरीत मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत.
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रत्येकाला घरात राहण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. मात्र, खेड तालुक्यातील आदिवासी भागात राहाणाऱया गोपाळे कुटुंबात आज ही दुर्दैवी घटना घडली असून गोपाळे कुटुंब पती, पत्नी व तीन मुली असा पाच जणांचा परिवार राजगुरुनगरजवळील शिरोली येथे वास्तव्यास होता. मात्र, लॉकडाऊनच्या काळात हे कुटुंब आपल्या मूळगावी चिखलगाव येथे गेले होते. मात्र, आज दुपारच्या सुमारास दोन चिमुकल्या मुलींसह आईचा मृतदेह शेताजवळील विहिरीत आढळून आला आहे. त्यामुळे या मायलेकींनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली यामध्ये अद्यापही संभ्रम निर्माण झाला असून राजगुरुनगर पोलीस तपास करत आहे. लॉकडाऊनच्या काळात मायलेकींचे मृतदेह आढळून आल्याने खेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.