दौंड (पुणे) - तालुक्यातील सोनवडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत कामात हलगर्जी केल्याप्रकरणी अखेर शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ वनवे यांनी दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे . या प्रकरणाचा अधिक तपास दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक लोंढे हे करीत आहेत.
मतदान केंद्रावर कामात हलगर्जीपणा -
दौंड तालुक्यातील सोनवडी या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान झाले. यावेळी येथील केंद्र क्रमांक २-अ या ठिकाणी नानासाहेब रामचंद्र शिंदे हे मतदान केंद्रावर मतदान केंद्र अध्यक्ष होते. मतदान केंद्र अध्यक्ष असताना त्यांनी एक महिला मतदान कक्षात मतदान करण्यासाठी आली होती. सदर महिलेला मतदान करताना मतदान केंद्राध्यक्ष नानासाहेब शिंदे यांनी यथोचित प्राधिकाराशिवाय सदर महिलेचा विरोध असतानाही त्यांचे मतदान स्वतः केले होते.
दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा -
सदर बाब लक्षात आल्यानंतर तहसीलदार संजय पाटील यांनी दौंड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ वनवे यांना या प्रकरणी कारवाईसाठी प्राधिकृत केले होते. मतदान केंद्र अध्यक्ष शिंदे यांनी नेमुन दिलेल्या मतदानाच्या कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबाबात गटशिक्षणाधिकारी नवनाथ वनवे यांनी दि. २४ रोजी फिर्याद दिली आहे. त्यावरून मतदान केंद्राध्यक्ष नानासाहेब शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.