पुणे : पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड परिसरात प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मार्कटयार्ड परिसरात लिंबू - मिरची विकणाऱ्या विक्रेत्यांवर काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. त्या विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दलित पँथरच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते पहाटेच रस्त्यांवर उतरले असून मार्केट यार्ड प्रशासनाविरोधात हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनामुळे परिसरात मोठी वाहातूक कोंडी पाहायला मिळत आहे.
मार्केट यार्ड परिसरात आंदोलन : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये काही लिंबू विक्रेते आणि मिरची विक्रेते हे अनधिकृतपणे, पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये विक्री करतात, असा प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे प्रशासनाने अनधिकृत विक्रेते त्याचबरोबर छोटे भाजी विक्रेते यांना मार्केट यार्डमध्ये बसून विक्री करण्यास मनाई केली होती. या सर्वांमुळे वाहतूक कोंडी आणि अडचण होत होती. हे लक्षात घेता हा निर्णय घेतला असल्याचे मार्केट यार्ड प्रशासनाने सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच लिंबू विक्रेत्यांकडून मोठे आंदोलन मार्केट यार्ड परिसरात करण्यात आले होते. परंतू प्रशासनाने त्याची दखल घेतली नव्हती. प्रशासनाने आपला निर्णय बदलण्यास नकार दिला होता.
दलित पॅंथर आक्रमक : या लिंबू विक्रेत्यांच्या कारवाईवर दलित पॅंथर आक्रमक झाले आहेत. दलित पॅंथरच्यावतीने मार्केट यार्ड परिसरात सकाळपासूनच आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये विक्रेत्यांनी मोठी गर्दी केलेली आहे. त्याचबरोबर या आंदोलनात दलित पॅंथरचे नेते कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत. सर्व आंदोलक आक्रमक झालेले दिसत आहेत. ताबडतोब लिंबू विक्रेत्यांना लिंबू विक्री करण्यासाठी जागा द्या. त्याचबरोबर त्यांच्यावर होणारी कारवाई थांबवा. अशी मागणी दलित पँथरकडून करण्यात आली आहे. आज रविवारअसून सुद्धा मार्केट यार्डमध्ये मोठी गर्दी दिसत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक मार्केट यार्डमध्ये खरेदीला येत असतात. आंदोलनामुळे ग्राहकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
लिंबू मिरची विकण्यासाठी जागा : मार्केट यार्ड प्रशासनाने आमची दखल घेऊन आम्हाला लिंबू - मिरची विक्रीला बसण्यासाठी जागा द्यावी असे म्हटलेले आहे. देशाच्या राष्ट्रपती आदिवासी म्हणून तुम्ही नियुक्त केले. परंतू आम्ही आदिवासी बांधव लिंबू मिरची विकत असताना आमच्यावर अन्याय का असे या आंदोलकांचे म्हणणे आहे. आम्हाला थोडीशी जागा का होईना परंतू लिंबू आणि मिरची विकण्यासाठी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मार्केट यार्ड परिसरात जोरदार घोषणाबाजी करत आहे.