पुणे : सध्या सोशल मीडिया आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. केरळ राज्यातील मुन्नार जिल्ह्यातील एका शेतात वीज पडून द्रवपदार्थ सापडले आहे. हा पदार्थ नासा सॅटेलाइटमध्ये वापरणाप असल्याचे सांगून हडपसर भागातील एका वृद्ध दाम्पत्याची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद : या प्रकरणात रेखा प्रभाकर महिंद्राकर (वय ६५) रा.मॅजेस्टिक नेस्ट फुरसुंगी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याआधारे पोलिसांनी सतीश धुमाळ (वय ४६) वैशाली सतीश धुमाळ (वय ४२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
गुंतवणूक केल्यास दहापट रक्कम : याबाबत अधिक माहिती अशी की, रेखा प्रभाकर महिंद्राकर त्यांचे पती प्रभाकर महिंद्राकर रा.मॅजेस्टिक नेस्ट फुरसुंगी सोसायटीत राहतात. त्यांच्याच सोसायटीत एक वर्षापूर्वी सतीश धुमाळ हे सहाव्या मजल्यावर राहण्यास आले होते. एके दिवशी सतीश धुमाळ, त्यांची पत्नी वैशाली धुमाळ फिर्यादी रेखा यांच्या घरी आल्या होत्या. त्यांना केरळमधील मुन्नार जिल्ह्यातील एका शेतात वीज पडल्याने द्रव आढळल्याचे सांगितले. हा पदार्थ सॅटेलाइटमध्ये वापरला जातो. हा पदार्थ नासा 40 हजार कोटी रुपयांना खरेदी करेल असे सांगितले. जो कोणी गुंतवणूक करेल त्यांच्या दहापट रक्कम देईल, असे सांगून आपली 1 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.
1 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक : ते पुढे म्हणाले की, आरोपी सतीश मिसाळ याने आमचीच नव्हे तर, अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. आम्ही आमच्या पैशांबाबत विचारणा केली, असता त्याने आमच्या घरात घुसून आम्हाला मारहाण केली असा आरोप दाम्पत्याने केला आहे. अशा घटनाना कोणीही बळी पडू नये, असे आवाहन रेखा प्रभाकर महिंद्राकर तसेच प्रभाकर महिंद्राकर यांनी केले आहे.