पुणे - सिरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड ही लस घेऊन जाणारे पुढील तीन कोल्ड कंटेनर आज सीरम इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. सीरम इन्स्टिट्यूटला कोविशील्ड या लसीची पहिली ऑर्डर मिळाल्यानंतर काल एकूण सहा कोल्ड कंटेनर सीरममध्ये दाखल झाले होते. त्यातले तीन कोल्ड कंटेनर आज पहाटे विमानतळावरून देशभरात पाठवण्यात आले. तर उर्वरित तीन कंटेनर हे सीरम इन्स्टिट्यूटमधून सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान बाहेर पडतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, अद्याप हे कंटेनर बाहेर पडलेले नसून दुपारनंतर याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
तीन कंटेनर लोहगाव विमानतळाकडे रवाना -
कोरोनाच्या प्रतिकारासाठी सीरम इन्स्टिट्युटने तयार केलेल्या 'कोविशिल्ड' लसीने भरलेले तीन कंटेनर आज कंपनीतून पहाटे ४.५० वाजता लोहगाव विमानतळाकडे रवाना झाले होते. यानंतर आता आणखी तीन कंटेनर सीरम इन्स्टिट्युटमधून विमानतळाकडे रवाना होणार होते. ही लस १६ जानेवारीपासून सुरू करण्यात येणाऱ्या देशांतर्गत लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. यावेळी कंपनीचे मांजरी कार्यालय ते लोहगाव रस्त्यावर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.