पुणे - आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत दरवर्षी लहानग्यांपासून वृद्धापर्यंत सर्वजण मोठ्या जल्लोषात करतात. पण यंदा कोरोनामुळे तसा उत्साह पाहायला मिळाला नाही. कोरोना स्थितीत वाढलेली बेरोजगारी ओळखून यंदाच्या वर्षी मूर्ती विक्रेत्यांनी मूर्तींची किंमतही कमी केली. पण, या वर्षी गणेश मूर्तीच्या विक्रीचे प्रमाण तब्बल ३० ते ४० टक्क्यापर्यंत घटल्याचे दिसून आले. तसेच कोरोनाचा परिणाम फुले विक्रेत्यांवरही पाहायला मिळाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ४ फूटी तर घरगुती २ फूटी ऊंचीच्या 'श्री'च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करावी, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. पण, मूर्तीकारांनी कोरोनाचे संकट येण्याआधीच जास्त ऊंचीच्या मूर्ती घडवल्या. पण यंदा त्याची विक्री झाली नाही. इतकेच नव्हे तर लहान मूर्ती खरेदीसही नागरिकांनी पाठ फिरवली. या वर्षी गणेश मूर्तीची विक्रीत मोठी घट पाहायला मिळाली. महत्वाची बाब म्हणजे, मूर्ती विक्रेत्यांनी मूर्तीचे दर कमी करुनही नागरिकांनी खरेदी केली नसल्याचे दिसून येत आहे.
आमच्याकडे फिक्स ग्राहक आहे. जे दरवर्षी मूर्ती बुकिंग करतात. पण यंदा कोरोनामुळे फक्त काही मोजक्याच ग्राहकांनी मूर्ती बुकिंग केली आहे. जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा कमी प्रमाणात यंदा मूर्ती विक्री झाली आहे, अशी माहिती मूर्ती विक्रेता लक्ष्मण देवकर यांनी दिली.
दुसरीकडे पूजेसाठी लागणारी फुले, बाजारात महाग विकली गेली. पण त्या विक्रीलाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला. या कारणाने फुल विक्रेत्यांनी छोटे हार विक्रीसाठी ठेवले होते. यंदा खूप कमी प्रमाणात फुलांच्या हाराची विक्री झाली आहे. नागरिक बाहेर पडत असले तरी खरेदीसाठी खूप विचार करत आहे, असा भावना फुल विक्रेत्यांनी व्यक्त केल्या. आज शहरातील काही प्रमुख पेठांमध्येच गर्दी होती. तर काही ठिकाणी रस्ते सुमसाम होते.
हेही वाचा - अनावधानाने झालेल्या 'त्या' चुकीबद्दल प्रवीण तरडेंनी मागितली जाहीर माफी
हेही वाचा - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर पोलीस दलातील श्वान नतमस्तक, पाहा व्हिडिओ