पुणे - कोरोनाबाधित रुग्णांना ऐनवेळी ॲम्ब्यूलन्स उपलब्ध होत नाही. जवळचे लोकही त्यांना आपल्या वाहनातून रुग्णालयात नेण्यास नकार देत असतात. असे असताना, जुन्नरमधील तीन युवकांनी स्वत:चे वाहन अशा बाधित व्यक्तींना रुग्णालयापर्यंत पोहचविण्यासाठी मोफत उपलब्ध करुन प्रशासनाला मदतीचा हात दिला आहे.
कोरोना काळात एक अनोखा उपक्रम
पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील निलेश चव्हाण या तरूणाने कोरोना काळात एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. तो आपल्या स्वतःच्या वाहनातून कोरोना रुग्णांना रूग्णालयात पोहचवण्याचे कार्य करत आहे. परिसरातल्या धालेवाडी, सावरगाव, वडज परिसरातील विविध गावांतील करोनाबाधित रुग्णांसाठी तो रुग्णालयात जाण्यासाठी स्वत:चे वाहन मोफत उपलब्ध करुन देत आहे. निलेशच्या पावलावर पाऊल ठेवून जुन्नरमधील राज फौंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनीही जुन्नर परिसरातील रुग्णांसाठी ही सेवा देऊ केली आहे. तर जुन्नरच्या पश्चिमेला असलेल्या निरगुडे, आपटाळे, बेलसर, सुराळे, बोतार्डे या गावांतून बाधित होणाऱ्या रुग्णांसाठी कमलेश वंडेकर या तरूणाने देखील आपले स्वत:चे वाहन उपलब्ध करून दिले आहे.
प्रशासनाने या तिघांचे कौतुक केले आहे
ऐन कोरोना संसर्ग वाढीच्या स्थितीत एकीकडे कुटुंबातील अनेक सदस्य करोना संसर्गित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या बाधित रुग्णांना ऑक्सीजन सुविधा असलेल्या रुग्णालयांपर्यंत पोहचवणे, तसेच अन्य प्रकारची मदत करण्याचे शिवधनुष्य या तिघांनी पेलले आहे. प्रशासनाने या तिघांचे कौतुक केले आहे.
पंचक्रोशीत कौतुक
या सामाजिक उपक्रमाबद्दल या युवकांचे जुन्नर तालुक्यातील पंचक्रोशीत कौतुक होत आहे. यासोबतच रुग्णाच्या कुटुंबियांकडूनही कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत या तिघांच्या माध्यमातून मागील 15 दिवसांत 75 पेक्षा जास्त कुटुंबातील कोरोना सदृष्य लक्षणे असलेले, तसेच करोनाबाधित असलेल्या रुग्णांना, कुटुंबियांच्या इच्छेनुसार शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात वाहनांतून नेले आहे. अत्यंत कठीण प्रसंगात, हे काम सगळे मंडळी करत आहेत. जोवर कोरोना आहे तोवर ते करणार आहेत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - पुण्यातील एका डॉक्टरचा घरात आढळला मृतदेह; तर बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू