पुणे - राज्यातील अनेक ठिकाणाहून सोमवारपासून मान्सून परतीच्या मार्गावर आहे. मात्र, पुण्यात आज अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मुंबई नांदेडसह विदर्भाच्या 55 टक्के भागातून मान्सून परतला आहे. 14 ते 17 तारखेपर्यंत राज्याच्या दक्षिण भागातही पाऊस कमी होत आहे, तर पुढील 48 तासात पुण्यासह राज्यातील उर्वरित भागातून मान्सून परतेल. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मात्र, मान्सून परतल्यानंतर पुन्हा पुण्यासह दक्षिण महाराष्ट्रात 18 ऑक्टोबरपासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. 19, 20 आणि 21 ऑक्टोबरला देखील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, तर 21 तारखेपासून पाऊस कमी होईल. मात्र, या चार दिवसात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल. कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.