पुणे - मागील आठ दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरुर तालुक्यात ढगाळ हवामानासह सकाळी पांढ-या धुक्याची चादर पसरत आहे. काही भागात पावसाच्या तुरळक सरीही कोसळत आहेत. या वातावरण बदलामुळे पिकांवर किड, रोगराई पसरत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
ऐन थंडीच्या काळात पिकांवर रोगराई -
रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला, कांदा या पिकांवर वातावरणातील बदलामुळे रोगराई पसरत आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर औषध फवारणी करावी लागणार आहे. यातून शेतकऱ्यांच्या आधिकच्या खर्चात भर पडणार आहे. ऐन थंडीच्या काळात पिकांवर रोगराई पसरल्याने गहू व हरभरा या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतक-यांची चिंत्ता वाढली -
यावर्षी शेतकऱ्यांवर आस्मानी संकटासह सुलतानी संकट आले. पहिले कोरोना, लॉकडाऊन, चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि आता वातावरणातील बदलामुळे पसरत चाललेली रोगराई यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. पिकांसह भाजीपाला, फळबागांवर किड आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे औषध फवारणी करूनही उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. शेतमालाला योग्य बाजारभावाची खात्रीही मिळणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कृषी सल्ला घेऊनच औषध फवारणी करा -
थंडगार वातावरण रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक असते. मात्र, थंडीच्या काळात दंव पडून वातावरणात धुक्याचे प्रमाण वाढल्यास पिकांवर विविध रोगराई सक्रिय होण्याची भिती असते. सध्याचे हे वातावरण असेच टिकून राहिले, तर पुढील काळात पिकांसह फळबागांना मोठा धोका होणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी तत्काळ कृषी सल्ला घेऊन औषध फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.