पुणे : याबाबत अंतराळ शास्त्रज्ञ लीना बोकील म्हणाल्या की, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आतापर्यंत ज्या काही मोहीम हाती घेतल्या आहेत, त्यात मंगळ यान, चंद्रयान 1, चंद्रयान-2 आणि आता चांद्रयान 3 ही मोहीम हाती घेतली आहे. चंद्रयान 2 चंद्रावर लँड आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर चंद्रयान 2 ही मोहीम अपूर्ण राहिली होती; परंतु आता भारताने चांद्रयान 3 मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम अतिशय महत्त्वाची व मोठी अशी ठरणार आहे. ही मोहीम यशस्वी झाली तर अनेक महत्त्वाचे संशोधन आपल्या हाती लागणार आहेत आणि जी भारतासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, इस्रोने तरुण संशोधकांच्या मदतीने चंद्रयान 3 ची निर्मिती केली आहे. हे भारतीय बनावटीचे असून काही बाबी या बाहेरून आणल्या आहेत, अशी माहिती लीना बोकील यांनी दिली.
शास्त्रज्ञ लीना बोकील यांच्याशी बातचीत : चांद्रयान 3 हे भारतीय अंतराळ संशोधन यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. या ठिकाणी आतापर्यंत कुठलेही यान पोहोचले नाही. संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांकरिता चांद्रयान 3 मोहीम अत्यंत महत्त्वाची व मोठी अशी ठरणार आहे. चांद्रयान 2 नंतर भारताचा दुसरा प्रयत्न असणार आहे. एकूणच चांद्रयान 3 मुळे काय फायदा होणार आहे आणि याचे वैशिष्ट्य काय आहे याबाबत बोकील यांनी माहिती दिली.
चांद्रयान श्रीहरीकोटा येथून उड्डाण घेणार : चांद्रयान 3 मोहीमेला येत्या 14 जुलै रोजी सुरुवात होणार आहे. चांद्रयान आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून उड्डाण घेणार असले तरी या यानाचे इंजिन मुंबईच्या गोदरेज कंपनीत तयार झाले आहे. सुमारे 80 टनाचे हे इंजिन इस्रोच्या डिझाईन नुसार तयार करण्यात आल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी माणिक बेहराम यांनी दिली आहे.
इंजिनचे 80 टक्के काम गोदरेज कंपनीत झाले : चांद्रयान 3 साठी लागणाऱ्या इंजिनचे 80 टक्के काम मुंबईतील गोदरेज कंपनीत पूर्ण झाले आहे. चांद्रयानामधील एल 110 विकास इंजिन आणि क्रायोजनिक इंजिन हे गोदरेज कंपनीत तयार करण्यात आले आहेत. या इंजिनमध्ये नेमके कोणते भाग वापरण्यात आले आहेत, हे नुकतेच गोदरेज कंपनीच्या वतीने प्रसार माध्यमांना दाखवण्यात आले. चांद्रयानात 160 टनाचे लिक्विड इंजिन आणि क्रायोजनिक इंजिन वापरण्यात आले आहे. या इंजिनची चाचणी घेतल्यानंतरच त्याला कायम करण्यात आले आहे. इस्रोच्या या मोहिमेसाठी गोदरेज कंपनीला योगदान देता आले, याचा गोदरेजला अभिमान वाटत असल्याचे माणिक यांनी सांगितले आहे.
हेही वाचा: