शिरूर - सध्या बैलगाड्यांच्या शर्यतींना परवानगी नाही. पण पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी मधील निघोज कुंडाजवळ बेकायदा बैलगाड्यांची शर्यत भरवण्यात आली. त्यामुळे टाकळी हाजीचे उपसरपंच तुकाराम विश्वानाथ उचाळे यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.
बेकायदा बैलगाडी शर्यतीचे नियोजन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (21 जून) सकाळी 7 ते 11 वाजेच्या दरम्यान शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी गावच्या परिसरातील निघोज कुंड पर्यटन केंद्र मळगंगा कोविड सेंटर पाठीमागे होणेवाडी येथे ५० पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन बेकायदा बैल गाडी शर्यत भरवली. तसेच, बैंलाना पळवून मुद्दाम निदर्यीपणे वागणूक दिली. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले. कारण बैलगाड्यांच्या शर्यतीला बंदी आहे. शिवाय, अनेक लोंकाची गर्दी जमवून कोरोना नियमांचेही उल्लंघन केले.
उपसरपंचासह अनेकांवर गुन्हा दाखल
त्यामुळे या बैलगाडी शर्यतीचे नियोजन करणाऱ्या तुकाराम विश्वानाथ उचाळे (उपसंरपच, टाकळीहाजी), राजु सोना गावडे, खंडू दगडु गावडे, संतोष बनशी गावडे, गणेश म्हतु गावडे, गणेश कसबे (सर्व रा. टाकळी हाजी ता. शिरूर जि. पुणे), संभाजी निचीत (रा. वडेनर खुर्द ता. शिरूर जि. पुणे), रमेश जयसिंग पानसरे (रा. वडेनर बुा ता.पारनेर जि. अ.नगर) व काही अनोळखी व्यक्तींवर १८८,२६९ राष्ट्रीय आपत्ती कायदा कलम ५१ (ब), महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना २०२० कलम ११, साथीचा रोग प्रतिबंधक कायदा १९८७ मधील खंड २, ३, ४ व म.पो.कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस करत आहेत.
'सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते, की आपल्या गावांमध्ये अशा प्रकारची कोणीही बेकायदा बैलगाडी शर्यत भरवल्यास त्याबाबत तत्काळ शिरूर पालीस ठाणे येथे कळवावे. बैलगाडी शर्यत भरविणे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बेकायदेशीर आहे. आपण अशा प्रकारे बैलगाडी शर्यत भरवल्यास आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो', असे शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - नागपूर हादरले!!! पत्नी, मुलगा, मुलगी, सासू आणि मेहुणीला भोसकून आलोक माटूरकरने घेतला गळफास