पुणे - शहरातील वाघोली आणि हडपसर येथील दोन ठिकाणी आग लागली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी रात्री १ च्या दरम्यान घडली. वाघोलीतील चारचाकी वाहनांच्या गोडाऊनला आग लागली तर हडपसर परिसरातील हंडेवाडी-होळकरवाडी रोडवर प्लॅस्टिकच्या गोडाऊनला आग लागली. अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना आग विझवण्यात यश आले आहे.
पुणे-नगर रोडवर वाघोलीत वाघेश्वर मंदिराजवळ एका चारचाकी वाहनांच्या गोडाऊनला आग लागली. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात साहित्य जळाले आहे. पुणे महापालिका व पीएमआरडीए अग्निशमनदलाच्या मदतीने आग विझवण्यात आली. तर दुसरी आगीची घटना हडपसर परिसरातील हंडेवाडी-होळकरवाडी रोडवर प्लॅस्टिकच्या गोडाऊनला आग लागली. दोन्ही आगीत कुठलीच जीवितहानी झाली नाही.
पुणे अग्निशमन दलाच्या २ गाड्या, पीएमआरडीए २, एमआयडीसी १, खाजगी ४ टँकर आग विझवण्यासाठी वापरले. वाघोली येथील साई सर्व्हिस कार शोरूम आणि सर्व्हिस सेंटरची आग राञी 1 च्या सुमारास लागली, या आगीमध्ये करोडो रुपयाचे नुकसान झाले आहे.