पुणे - पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन पीएमपीएमएलच्यावतीने शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात 5000 पेक्षा जास्त रक्ताच्या बॅगचे संकलन करण्याचा संकल्प देखील करण्यात आला आहे. आज (शनिवार) सकाळपासून पीएमपीएमएलच्या 15 डेपोत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वारगेट डेपोत 1 तासात 150 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केला आहे.
मोठ्या उत्साहात कर्मचाऱ्यांचा सहभाग -
पुणे परिवहन महामंडळात एकूण 10 हजार कर्मचारी काम करतात. ते आज आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात कर्मचारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहे. शहरातील विविध डेपोतही कर्मचारी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिराला उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह पुण्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. तसेच जून आणि जुलै महिन्यात राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो, हा तुटवडा दूर करण्यासाठी पीएमपीएमएलकडून आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिरात महिलांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद -
रक्तदान हे श्रेष्ठदान मानत या रक्तदान शिबिरात महिलांचाही सहभाग हे उत्स्फुर्त होता. मोठ्या संख्येने विविध डेपोतील महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत रक्तदान केले आहे. रक्तदान केल्याने काहीही होत नाही. म्हणून आज आम्ही महिला या रक्तदान शिबिरात भाग घेऊन राज्यात जो रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्याला काहीतरी हातभार लागावा म्हणून आज आम्ही रक्तदान शिबिरात रक्तदान करत आहोत. असे यावेळी काही महिला रक्तदात्यांनी सांगितले.
रक्तदान केल्यानंतर विविध कर्मचाऱ्यांचे संगीतावर डान्स -
पीएमपीएमएलच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराला डीजे लावून काही कर्मचारी नाचतानाही दिसून आले. रक्तदान करताना मनोरंजन व्हावे या उद्दिष्टाने जरी हे सांगीतिक कार्यक्रम आयोजन जरी करण्यात आले असले तरी कोरोनाच्या निर्बंधांचा या कर्मचाऱ्यांना विसर पडला की काय अशी शंकाही काहींनी व्यक्त केली.
हेही वाचा - 'प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या गावात 30 बेडचे रुग्णालय सुरू करा'