भोर (पुणे) - कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे भोर शहर आठ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत झालेल्या तपासणीत भोरमध्ये एकाच दिवशी 42 जण कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास आले तर 266 जण संशयित व 105 जणांची अँटीजन टेस्ट करण्यात आली होती.
21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालावधीत भोर पूर्णपणे बंद राहणार आहे. आजपासून पुढील आठ दिवस कडकडीत बंद पाळला जाणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून भोर बंदचा निर्णय भोर प्रांताधिकारी आणि नगरपालिका मुख्य अधिकारी यांनी घेतला आहे. या काळात कोणीही विनाकारण तसेच विनामास्क फिरल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करत सकाळपासूनच बंदला प्रतिसाद दिला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक दिवसंदिवस वाढत चालला आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 48 हजार 501 रुग्णांपैकी 2 लाख 344 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
जिल्ह्यात 42 हजार 639 इतके सक्रिय रुग्ण आहेत. 5 हजार 518 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.22 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 80.62 टक्के आहे.
हेही वाचा - CORONA : कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या चाचणीला सुरुवात; भारतात 1600 तर पुण्यात 200 जणांवर होणार चाचणी