पुणे - शहरातील विविध शाखेतील अधिकाऱ्यांच्या पासवर्डचा वापर करुन बँकेची तब्बल 2 कोटी 56 लाख 15 हजार 998 रुपयांना फसवणूक करणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकाला दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच 24 लाख रुपयांची रक्कम दंडापोटी वसूल केली जाणार आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. मे 2018 च्या दरम्यान हा घोटाळा उघडकीस आला होता.
शालिवाहन मुकुंद सोलेगावकर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या बँक व्यवस्थापकाचे नाव असून राकेश जाधव या खासगी व्यक्तीस 3 वर्ष तुरुंगवास आणि 10 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी बँकेच्या अधिका-याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला होता. 28 जुन 2018 ला सीबीआयकडे या गुन्हयाचा तपास सोपविण्यात आला.
हेही वाचा - ..तर उन्हाळ्यात पिकांची धूळधाण झाली असती, 'त्या' निर्णयावर अजित पवारांच स्पष्टीकरण
सीबीआयने तपास सुरु केल्यानंतर त्यांना सोलेगावकर याने जाधव याच्या मदतीने बँक ऑफ महाराष्ट्रच्या वेगवेगळ्या 5 शाखांमध्ये फसवणुकीचा कट रचल्याचे समोर आले. यातून दोन्ही आरोपींनी बँकेच्या निधीतून अंदाजे एकूण 2 कोटी 56 लाख 15 हजार 998 रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले. सोलेगावकर याने आपल्या पदाचा गैरवापर करुन शाखेतील अधिका-यांचा पासवर्ड वापरुन फसवणूक केली. सोलेगावकर याने बँकेच्या वेगवेगळ्या पदांवर काम केले. ते काम करताना त्याने राकेशच्या नावाने उघडण्यात आलेल्या बचत खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित केली होती.