पुणे: काळानुरूप एसटी महामंडळ आपल्या सेवेत देखील बदल करते आहे. महामंडळाच्या ताफ्यात नवनवीन व अत्याधुनिक बसेस दाखल होत आहेत. आरामदायी प्रवासाची सेवा देण्याच्या दिशेने देखील महामंडळाची पाऊले पुढे पडत आहेत. पूर्वीपासूनच बसमध्ये चालक आणि वाहक दोघेही पुरुषच आहेत. परंतु मध्यंतरीच्या काळात महिलांना वाहक म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. आता बसेसमध्ये महिला वाहक प्रवाशांचे तिकीट काढताना दिसून येतात. केवळ वाहक म्हणूनच नाही तर चालक म्हणून देखील आता महिलांना संधी देण्याचा विचार एसटी महामंडळात 2018-19 मध्ये घेतला.
दिड वर्षापासून प्रशिक्षण सुरू : महिला चालकांच्या भरतीची प्रक्रिया मार्च 2019 मध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर कोरोना काळ असल्याने मागच्या दिड वर्षापासून पुण्यात या महिला चालकांचे प्रशिक्षण सुरू झाले. सुरुवातीला या प्रशिक्षणात 30 महिला चालक यांनी सहभाग घेतला होता. मात्र नंतर 17 महिला या रेग्यूलर येत आहेत. यात शितल शिंदे या महिला चालकाने तर चक्क ॲक्सिस बँकमधील नोकरी सोडून महिला चालक व्हायचे ठरवले आहे.
लालपरीसाठी बँक मॅनेजरचा जॉब सोडला: बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन चाललेल्या लाल परीला खरंच महिला वाहकाच्या रूपाने शिक्षित पऱ्या मिळाल्या आहे. आज प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहे. आता एसटीचे चालकही महिला होणार आहेत. पुण्यातील प्रशिक्षण शिबिरात असलेल्या शितल शिंदे यांनी सन 2014 साली पुण्यातील बंद गार्डन येथील ॲक्सिस बँकमध्ये मॅनेजर म्हणून काम करायला सुरूवात केली. चार वर्ष शितल यांनी बँक मॅनेजर म्हणून काम केले. पण लहान पणापासूनच लालपरी बाबत असलेले आकर्षण शितल यांचे मन खात होते. आणि जेव्हा 2019 साली महिला चालक म्हणून जाहिरात निघाली तेव्हा तर त्यांनी मॅनेजरचा जॉब सोडून दिला आणि महिला चालक व्हायचे ठरवले.
एसटी चालवताना खूप आनंद होतो: कधीही फोर व्हीलर न चालवणाऱ्या शितल यांना एसटी चालवण्यासाठी खूप मेहेनत घ्यावी लागली. सुरूवातीला गाडी सुरू करायला देखील भीती वाटत होती. कारण कधीही घरच्यांनी भीतीपोटी चारचाकी वाहन चालवायाला दिले नाही. जेव्हा याच लालपरीचे स्टरींग हातात आले तेव्हा मला खूप आनंद झाला. आज जेव्हा या दीड वर्षाचा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एसटी चालवतानाचा एक वेगळाच आनंद होत आहे. असे शितल यांनी सांगितले. शितल यांच्या सारख्या इतरही महिला उच्चशिक्षित आहेत. एसटी चालवणे हे सोपे काम नाही हेच काम आणि ही जबाबदारी शितलने आता आपल्या हातात घेतली आहे. शितल यांनी सुरूवातीला एसटी चालवायला शिकली नंतर चारचाकी आणि मग दोन चाकी चालवायला शिकल्या आहेत.
महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट: एसटी महामंडळाने महिलांसाठी एसटी चालक म्हणून उपलब्ध करून दिलेली संधी महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र कोरोना काळात या सरळसेवा भरती अंतर्गत झालेल्या भरतीला जसा ब्रेक लागला. तसा ब्रेक आताच्या या महिलांसाठीच्या भरतीला लागू नये हीच अपेक्षा. एसटी महामंडळाने चालक-वाहक म्हणून आदिवासी व दुष्काळग्रस्त भागातील महिलांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महिला चालकांची भरती करण्याची प्रक्रिया साधारण मार्च 2019 मध्ये सुरू झाली.आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर यातील 194 महिलांची निवड करण्यात आली.आणि त्यानुसार त्या त्या जिल्ह्यात या महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे.गेल्या वर्षीपासून प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून महिला चालकांची सध्या 80 दिवसांची अंतिम चाचणी सुरू आहे. या 80 दिवसांमध्ये 800 किलोमीटर चालकांना पार करावा लागणार आहे आणि अंतिम चाचणीमध्ये घाट रस्ता, महामार्ग, रात्रीच्या प्रवास या सगळ्याच पद्धतीने प्रशिक्षण सुरू करण्यात आले.