पुणे - गुरुवारी सायंकाळी चांदणी चौकातील निर्जन परिसरात सापडलेल्या चार महिन्याच्या बाळाच्या कुटुंबीयांचा शोध अखेर लागला. माध्यमात बातमी पाहिल्यानंतर बाळाच्या वडिलांनी कोथरूड पोलिसात धाव घेतली आणि ही आपलीच मुलगी असल्याचे सांगितले. सध्या ही मुलगी वडिलांच्या ताब्यात असून तिची आई मात्र बेपत्ता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव परिसरातील तुकाराम क्षीरसागर यांची ही मुलगी आहे.
बातमी व्हायरल झाल्यानंतर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने तुकाराम यांना तुमची मुलगी असल्याचे सांगितले. त्यानंतर तुकाराम क्षीरसागर हे कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये आले आणि त्यांनी मुलीचा ताबा घेतला. तुकाराम हे पत्नी लक्ष्मीसह एकत्र कुटुंबात राहतात. ते स्वतः फर्निचरची कामे करतात. त्यांना यापूर्वीही एक मुलगा आणि मुलगी आहे.
गुरुवारी दुपारी तुकाराम कामावर गेले असताना बाळाची आई लक्ष्मी क्षीरसागर ही दवाखान्यात जाते असे सांगून, घराबाहेर पडली ती अद्याप परतली नाही. कुटुंबीयांनी शोधाशोध केला पण सापडली नाही. दरम्यान, आज बाळाची बातमी पाहून तुकाराम यांना धक्काच बसला. त्यांनी कोथरूड पोलिसात धाव घेत ही आपलीच मुलगी असल्याचे सांगितले. तुकाराम क्षीरसागर यांनी सांगितल्याप्रमाणे, आमच्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद झाला नव्हता तरिही असं काही घडणं हे माझ्यासाठी वेदनादायी आहे. पोलिसांनी या बाळाला वडिलांच्या ताब्यात सोपवले असून आईचा शोध सुरू आहे.