पुणे: यावर्षी महाशिवरात्री 18 फेब्रुवारीला आहे. देशातल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पुण्यातले भीमाशंकर, देशभरातले शिवभक्त येथे भगवान शंकारच्या दर्शनासाठी येतात. हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. परंतु आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हे महाराष्ट्रातले तीर्थक्षेत्र पळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. महाराष्ट्रातले भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरे नसल्याचा दावा आसाम सरकारने केला आहे. सहावे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा देखील आसाम सरकारने केला आहे. भाजपशासित आसाम सरकारने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरुन आता मोठा वाद निर्माण झाला आहे.
जाहिरातीव्दारे केले आवाहन: आसाम राज्यातील डाकिनी टेकडीच्या कुशित वसलेले पमोही गुवाहाटी येथील शिवलींग हे बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे श्री भीमाशंकर आहे. याठिकाणी होणाऱ्या महाशिवरात्री निमीत्त आयोजीत कार्यक्रमात भाविकांनी मोठया संख्ये यावे असे आवाहन एका जाहिरातीव्दारे आसामचे मुख्यमंत्री डाॅ.हिमंत बिसवा सरमा यांनी केले आहे. भीमाशंकर देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्त्री गवांदे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
मधुकरशास्त्री गवांदे यांची महिती: अनादिकालापासून पुणे जिल्हयातील भीमाशंकरमध्ये ज्योर्तिलिंग आहे. शिवपुराणात, शिवलीलामृतात याचा उल्लेख आहे. शंकरचार्यानी देखिल सहयाद्रि पर्वत रांगातील भीमानदी काठी वसलेले भीमाशंकर यावर काव्य रचले आहे. शिवाजी महाराजांपासून याला मानपान आहेत. आसाममध्ये भीमाशंकर असल्याचे प्रथमच आज ऐकायला मिळाले. येथील शिवलींग मोठे आहे तर भीमाशंकर मधिल शिवलींग शंकर व पार्वती असे दुभंगलेले आहे. असे भेद असलेले शिवमंदिर इतर कुठेही नाही. भीमाशंकर नावाने मंदिर असले म्हणजे ज्योर्तिलिंग होवू शकत नाही. देशातील इतर ज्योर्तिलिंगामध्येही असेच वाद निर्माण केले गेले. यावर भाविकांनी विश्वास ठेवू नका असे आवाहन गवांदे गुरूजी यांनी केले आहे.
अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट: ज्योतिर्लिंगाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचे नाही असे ठरवल की काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळे यांनी या जाहिरातीचा फोटोही शेअर केला आहे.