पुणे - खेड तालुक्यात वाळद-सुरकुंडी रस्त्यावरील पायलट पुलाखाली भीमा नदीच्या पात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. या व्यक्तीची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीला गळफास देऊन, त्याचे कपडे काढून मृतदेहाच्या पायाला दगड बांधून नदीत फेकण्यात आले आहे. आज(18 नोव्हेंबर) सकाळी स्थानिकांना हा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. खेड पोलीसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृतदेह कुजलेला असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांपुढे आव्हान आहे.
हेही वाचा - खोडदा नदीवरील बंधाऱ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
संबंधित व्यक्तीच्या गळ्यात भगव्या मण्यांची माळ आहे. त्याआधारे पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान, खेड पोलिसांनी खूनाप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करत आहेत.