पुणे - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले किंवा नाही झाले, तरी काही फरक पडत नाही. ते माणूस म्हणून कसे हे महत्त्वाचे आहे. मला त्यांचा नेहमी भक्कम पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
ग्रॅव्हिटी फाउंडेशन आणि उषा संजय काकडे यांच्यावतीने कर्तृत्ववान महिलांच्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन आणि पुरस्कार वितरण अमृता फडणवीस आणि गौरी खान यांच्याहस्ते झाले. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्याशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वैविध्य आहे. एका बाजूला श्रीमंती, तर दुसऱ्या बाजूला गरिबी आहे. त्यामुळे सामाजिक संस्थेद्वारे आपण समाजासाठी चांगले काम करू शकतो.
त्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले किंवा नाही झाले, तरी काही फरक पडत नाही. ते माणूस कसे हे महत्त्वाचं आहे. मला त्यांचा नेहमी भक्कम पाठिंबा आहे. मुख्यमंत्र्यांची पत्नी असण्याचे काही फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. दरम्यान, संगीताने ताण-तणाव कमी होतो. तसेच संगीताने जग बदलू शकते. त्यामुळे मी नेहमी गाणी गाते, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.
तसेच अमृता फडणवीस यांनी शाहरुख खानच्या चित्रपटातील 'हर घडी बदल रही है रूप जिंदगी, हर पल याहा जी भर जियो, जो है समा कल हो ना हो', हे कडवे देखील यावेळी गायले. त्यांच्या या गाण्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.