पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील तळीरामांची प्रतीक्षा अखेर संपली असून आज दुपारपासून वाईन शॉप, मद्याची दुकान उघडण्यास परवानगी मिळाली आहे. दरम्यान, आज सकाळी पासूनच रेड झोन परिसरात मद्याची दुकान उघडणार की नाही? असा संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, दुपारी 2 च्या नंतर शहरातील कन्टेंटमेंट झोन वगळून रेड झोनमध्येही वाईन शॉप आणि मद्याची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात वाईन शॉपच्या समोर तब्बल अर्धा ते 1 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.
पिंपरी-चिंचवड शहरात आज सकाळी पासूनच तळीरामांना मद्याची दुकाने आणि वाईन शॉप केव्हा उघडणार? अशी प्रतीक्षा होती. मात्र, दुपारी 2 च्या नंतर शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली. दुकानातून दारु घेण्यासाठी तळीरामांनी तब्बल अर्धा ते एक किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी 'सोशल डिस्टन्सिंग'चा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.
घश्याची कोरड भागवण्यासाठी तर काही तळीराम सकाळी 7 वाजल्यापासून वाईन शॉपच्या रांगेसमोर उभे होते. मात्र, 12 वाजले तरी वाईन शॉप उघडत नसल्याने त्यांनी घराची वाट धरली. परंतु, काही तास होत नाहीत तर शहरातील वाईन शॉप उघडल्याची माहिती वाऱ्यासारखी सोशल मीडिया आणि व्हाट्सअॅपवर पसरली. त्यामुळे शेकडो तळीरामांची गर्दी वाईन शॉपवर झाली.
करोनाचा प्रतिकार करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन अनेक वेळा प्रशासनाने केले आहे. मात्र, यावेळी तळीरामांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. 4 वाजेपर्यंत वेळ असल्याने अनेकांना रिकामे हात घेऊन घरी परतावे लागले. तर उद्या पासून सकाळी 10 ते 4 या वेळेत वाईन शॉप आणि मद्याची दुकाने उघडणार असली तरी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.