पुणे - ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजेश सापते यांनी आज पिंपरी-चिंचवड परिसरातील राहत्या घरात आत्महत्या केली आहे. त्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ शूट करून ठेवला होता. यामध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीतील लेबर युनियनच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. याप्रकरणी आता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने प्रतिक्रिया दिली आहे. ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगत ज्या कुणामुळे राजेश सापते
यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी केली आहे.
'आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई व्हावी' -
'आधीच कोरोनामुळे अनेक टेक्निशियन अडचणीत आहेत. त्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलादिग्दर्शक राजेश सापते यांनी आज आत्महत्या केली. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी केलेला व्हिडिओ पाहता युनियनचा काही लोकांनी त्यांच्यावर दबाव टाकला. मराठी कलावंत अडचणीत असताना अशा प्रकारे त्रास देणे हे चुकीच आहे. जा कुणामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली, त्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी', अशी मागणी मेघराज भोसले यांनी केली आहे.
आत्महत्येपूर्वी व्हिडीओ केला शेयर -
या व्हिडीओ मध्ये त्यांनी सांगितले की, चित्रपटसृष्टीतील एका लेबर युनियनचा पदाधिकारी राकेश मौर्या हा त्यांना नाहक त्रास देत आहे आणि बदनामी करत कामगारांचे पैसे बुडविल्याचा आरोप करीत आहे. जो तद्दन खोटा आहे. या व्हिडीओमध्ये राजू सापते म्हणाले की, ‘नमस्कार, मी राजेश मारुती सापते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. हे शूट करीत असताना मी कोणतीही नशा केलेली नाही आणि पूर्णपणे शुद्धीत आहे. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मौर्या जे लेबर युनियनचे पदाधिकारी आहेत, ते मला उगाचच खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचे पेमेंट तिथे थकीत नाही. सगळी पेमेंट्स नियमितपणे केलेली आहेत. माझ्याबद्दल लेबर युनियनमध्ये एकही तक्रार नाही. तरीही राकेश मौर्या हा व्यक्ती युनियनमधील काही कामगारांना मुद्दाम फोन करून, त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत.’
राजू सापते यांनी पुढे म्हटलेय की, 'मी नरेश मेस्त्री नामक व्यक्तीला फोन करून विचारले असता त्याने सांगितले की मी त्याचे कसलेही पेमेंट थकविलेले नाही. तरीही राकेश मौर्या हे मला खूप सतावत आहे आणि माझ्या कामात बाधा घालत आहे. सध्या माझ्याकडे ५ प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम मला तत्काळ सुरु करायचे आहे. राकेश मौर्याच्या त्रासामुळे मला 'झी'चे एक मोठा प्रोजेक्ट सोडून द्यावा लागला, तसेच दशमी क्रिएशनचे काम सुरु असताना त्याच्यामुळे ते मध्येच थांबवले गेले. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.’
हेही वाचा - महिलेला आक्षेपार्ह मॅसेज करणाऱ्या तरुणाला मारहाण करत केलं मुंडन