पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला जात असून उद्या पुण्यात देखील विविध संघटनांच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यावर राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या महागाई, बेरोजगारीने देशात कळस गाठला आहे. देशाचे केंद्रीय मंत्र्यांनी आर्थिक मंदी बाबत केलेल्या विधनाने समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना सत्ता गमावण्याची भीती वाटत असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
विविध पुस्कारांचे वितरण - वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटची ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण संस्थेची सभा मांजरी बुद्रुक येथील कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, तसेच संस्थेचे विश्वस्त, सदस्य, संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी, साखर उद्योगातील विविध मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. या सभेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या सन २०२१-२२ मधील विविध पुस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते.
देशात बेरोजगारीत वाढ - देशातील वाढती बेरोजगारी, महागाईमुळे समाजाक रोष निर्माण होत आहे. त्यामुळे त्याची किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागण्याची भीती वाटत आहे. देशाची सत्ता आपल्याला सोडावी लागणार या भीतीने राजकीय नेत्यांनामध्ये घबराट निर्माण झाली आहे. म्हणुन देशात जातीय तणाव निर्माण झाला तरी, आपण सत्तेत आलो पाहीजे असे जर कोणाला वाटत असेल तर ती लोकशाहीची थट्टा आहे. यापेक्षा दुर्दैव्य भारतीय लोकशाहीसाठी काय असू शकते असे पवार म्हणाले.
धार्मिक तेढ निर्माण निर्माण करणयाचा प्रयत्न - पुढे पवार म्हणाले की, दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची आठवण येते. ते असते तर कधीच असा विचार केला नसता. सभागृहात देखील वेगवेगळे प्रसंग निर्माण झाले. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सारखा विचार आत्ता ही व्हायला हवा. असे देखील यावेळी पवार म्हणाले. आपल्या देशात राज्यात 75 वर्ष झाली आपण गुण्यागोविंदाने राहत आहे. कुणालाही कोणाचीही जात माहीत नसते. परंतु सध्या विविध धर्मांचे मोर्चे राज्यात निघत आहे. यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहे. सर्व धर्म समभावच्या शिकवणीला तिलांजली देण्याचे काम सुरू आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माबाबत आदर असलाच पाहिजे. पण, त्याचा अतिरेक कोणीही करू नये. तसेच देशातील कायदा, सुव्यवस्था देखील बिघडता कामा नये. यासाठी आमच्या सहित विविध संघटनेने देखील सामंजस्य भूमिका घेतली पाहिजे असे मत पवार यांनी व्यक्त केले आहे.
ऊसाचे सर्व प्रश्न सोडविण्याची मागणी - अनेक वर्षाची व्हिएसआय संस्थेला परंपरा आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांना आम्ही बोलावतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आल्याची माहीती त्यांनी दिली. राज्यातील शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. ऊसाचे लागवड क्षेत्र जास्त असल्याने ऊसतोड कामगार कमी पडत आहे. त्या अनुषंगाने आपण काही निर्णय घ्यायला हवेत. तसेच साखर उद्योगातून 6 हजार कोटी टॅक्सच्या रूपात राज्य, केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होतात. त्यामुळे शेतकरी तसेच ऊस उत्पादनाबाबतच्या सर्व समस्या सोडवायला हव्यात अशी मागणी त्यांनी केली. अजित पवार यांना दावोसबाबत विचारण्यात आले असता, ते म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या शेजारी बोललो आहे. तेव्हा त्यांनी मला महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र, त्या करारात राज्यातील गुंतवणूकदारांचाच सहभाग असल्याची चर्चा राज्यभर आहे.
पोट निवडणूक बिनविरोध? राज्यातील कसबा, चिंचवड येथील पोटनिवडणुकीबाबत पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की सोमवार-मंगळवारी मुंबईत बसून महाविकास याबाबत चर्चा करणार आहेत. पिंपरी, चिंचजवडच्या बाबतीत पदाधिकारी आज पवार साहेबांना भेटणार आहेत. माझ्याकडे ही त्यांनी भेटण्याची ईच्छा व्यक्त केलेली आहे. भाजपकडून शंकर जगताप, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचे नाव कळले आहे. तसेच कसबा विधानसभेसाठी भाजपची काही नावे पुढे येत आहे. दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती ही इच्छुक आहेत. त्यांचा निर्णय भाजप घेतील आम्ही त्यात नाक खुपसने गरजेचे नाही. मात्र, दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी अशी ईच्छा दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे पोट-निवडणूक बिनविरोध होईल का? याबाबत मला शंका असल्याचे पवार म्हणाले.
आमचे विरोधक देखील कौतुक करणार - कृषिमंत्री अब्दुल सत्तार बारामतीत आले होते. यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, आमच्यावर कोणी काही ही आरोप करावेत. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण राहू द्या. मात्र, बारामती मधील 5 दिवसांचे कृषी प्रदर्शन हे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी त्याच अनुषंगाने पाहणी केली. आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने जीव ओतून काम करतो. त्यामुळे आमचे हे काम पाहून विरोधक देखील कौतुकच करणार, मग कोणी ही असो. येत्या 23 तारखेला बारामतीत पुन्हा एक कार्यक्रम होतो आहे. त्या कार्यक्रमाला माझी उपस्थिती नसेल अशी माहिती त्यांनी दिली.
कोयता गॅंगची दहशत - कोयता गँग बाबत ते म्हणाले कोयता गॅंगची दहशत अद्याप सुरू आहे. ती दहशत मोडून काढायला हवी. त्यांना ठेचून काढायला हवे. त्यांना मोक्का लावायला हवा. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलेन अस देखील यावेळी पवार म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत पवार म्हणाले की काश्मीरमध्ये ऍक्शन झालं की रिऍक्शन होतेच. तुम्ही अग्रेसिव्ह ऍक्शन घ्यायला गेला तर, समोरून तशी रिऍक्शन आली असेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - Mumbai Municipal Elections : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने ठोकले दंड, मिशन 150 ची घोषणा