पुणे - येरवडा कारागृहातील खिडकीचे गज उचकटून 16 जुलैच्या मध्यरात्री पाच कैद्यांनी पळ काढला होता. खून, दरोडा, मारामारी आणि मोक्याच्या या गुन्ह्यातील हे पाचही कैदी होते. यामधील देवगन अजिनाथ चव्हाण (वय 25) या कैद्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी पाठलाग करत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून अटक केली आहे.
16 जुलैच्या मध्यरात्री येरवडा कारागृहाच्या खिडकीचे गज उचकटून खुनासह दरोडा मोक्का गुन्ह्यातील ३, खंडणी मोक्का गुन्ह्यातील १ व घरफोडी गुन्ह्यातील १ असे एकूण ५ कैदी पळून गेले होते. त्यापैकी २ कैदी पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांनी यापूर्वीच पकडले होते. उर्वरित तिघांचा शोध सुरू होता.
येरवडा कारागृहातुन पळलेला 'तो' आरोपी अखेर गजाआड या कैद्यांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक अहमदनगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करत होते. परंतू, पोलिसांना माहिती काही मिळत नव्हती. पोलिसांना खबऱ्याकडून कैदी देवगन चव्हाण हा श्रीगोंदा येथे लपला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलिसांच्या तपास पथकाने कैद्याला पकडण्यासाठी वेश बदलून सापळा रचला. त्यानंतर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो पळून जाऊ लागला. त्यानंतर पोलिसांनी तब्बल पाच किलोमीटर अंतर पाठलाग करत त्याला जेरबंद केले. कैदी देवगण याने पोलिसांना ओळखू येऊ नये यासाठी दाढीमिशी आणि डोक्यावरचे केस पूर्ण कापले होते. देवगन चव्हाण याच्यावर दौंड व यवत पोलीस स्टेशनला खुनासह दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. त्याला पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.