पुणे : शहरातील गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध असून गणेशोत्सवासाठी जगभरातून नागरिक पुण्यात येतात. मात्र, पुण्यातील वानवडी येथील फ्लॉवर व्हॅली सहकारी गृहनिर्माण संस्थेतील एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला घराबाहेर गणेशमूर्ती बसवल्याप्रकरणी 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एकूण काय आहे प्रकरण याबाबतचा आढावा घेतला ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी.
गणपतीची मूर्ती काढण्याची नोटीस : फ्लॉवर व्हॅली ही वानवडी, पुणे येथील सहकारी गृहनिर्माण संस्था असून या सोसायटीमध्ये २७९ हून अधिक सदनिकाधारक आहेत. संध्या होनावर (६५) आणि त्यांचे पती सतीश होनावर (७२) या दाम्पत्याने २००२ मध्ये सातव्या मजल्यावर एक घर विकत घेतले होते. घर विकत घेतल्यानंतर त्यांनी वास्तुशांती केली. पुजाऱ्याने जोडप्याला घराबाहेर मूर्ती बसवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी 2002 मध्ये घराबाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसवली होती. 2005 मध्ये सोसायटीची नोंदणी झाली. तब्बल 20 वर्षांनंतर घराबाहेर मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याप्रकरणी सोसायटीने 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड दाम्पत्याला ठोठावला आहे. संध्या होनावर म्हणाल्या की, आम्ही घर विकत घेतल्यानंतर वास्तुशांती केली. त्यानंतर आम्ही घराबाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसवली, हे आमचे श्रद्धास्थान आहे. तसेच आजूबाजूला राहणारे लोक बाप्पाच्या दर्शनाला रोज येतात. माझे पती सतीश होनावर हे 2002 पासून या सोसायटीचे सभासद असून ते 2016 ते 2018 या काळात सोसायटीचे चेअरमन होते. मात्र, आजारपणामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
5 लाख 62 हजार रुपये दंड : 2019 साली संस्थेवर नवीन सदस्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी आम्हाला नोटीस पाठवली. तुमच्या घराबाहेर बसविलेली गणपतीची मूर्ती काढून टाका, असे त्यात लिहले होते. मात्र, होनावर यांनी मूर्ती काढण्यास नकार दिला. त्यामुळे सोसायटीने गणपतीची मूर्ती बाहेर ठेवली म्हणून 5 लाख 62 हजार रुपये दंड होनावर दाम्पत्याला ठोठावला आहे. यावर संध्या होनावर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोसाटीने जेव्हा नोटीस दिली, तेव्हापासून आम्ही न्यायालयीन लढाई लढत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.