पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या हजाराचा टप्पा गाठत होती. परंतु, गेल्या 3 दिवसांपासून ही आकडेवारी आटोक्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये काल दिवसभरात 748 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 20 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 727 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 23 हजार 682 वर पोहोचली असून सध्या शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. दिवसभरात 748 कोरोनाबाधित आढळले असून 727 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, आतापर्यंत 16 हजार 206 जण कोरोनामुक्त झाले आहेत. परंतु, मृत्यूच्या आकड्याने पाचशे पर्यंत मजल मारली आहे. मृत्यूचा वाढता दर कमी करण्याचे डॉक्टरांपुढे आव्हान आहे.
महानगर पालिकेच्या रुग्णालयात 3 हजार 895 सक्रिय रुग्ण आहेत. आज मृत झालेले रुग्ण भोसरी (स्त्री ५५ वर्षे, पुरुष ६० वर्षे, स्त्री ९० वर्षे), दापोडी (स्त्री ६० वर्षे, पुरुष ७० वर्षे, पुरुष ७२ वर्षे), सांगवी (पुरुष ९२ वर्षे, पुरुष २७ वर्षे), पिंपरी (स्त्री ६७ वर्षे, पुरुष ५८ वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ३० वर्षे, पुरुष ६१ वर्षे), थेरगाव (पुरुष ४९ वर्षे, पुरुष ५९ वर्षे, पुरुष ६६ वर्षे), काळेवडी (पुरुष ६५ वर्षे), निगडी (पुरुष ६४ वर्षे), फुगेवाडी (स्त्री ५९ वर्षे), माण (पुरुष ६८ वर्षे) आणि फुरसुंगी (पुरुष ७१ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
हेही वाचा- पुण्यातील 'या' 'राम मंदिराला आहे 268 वर्षांचा इतिहास