दौंड - पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील एका शेतकऱ्याच्या कांदा वखारीस आग लागल्याची घटना घडली. यात सुमारे ५५ टन कांद्याचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या आगीत सुमारे ९ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. ही आग कशामुळे लागली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. शेतकरी नाना जगताप यांनी या आगीबाबत यवत पोलीस स्टेशनला लेखी नोंद दिली आहे.
रात्रीच्या सुमारास लागली आग
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कासुर्डी येथील शेतकरी नाना जगताप यांनी घराच्या मागे अंदाजे ६०० फूट अंतरावर कांद्याची वखार लावली होती. या वखारीत त्यांनी ५५ टन कांदा साठवून ठेवला होता. ७ मे रोजी जगताप यांना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणारे प्रशांत काळभोर यांनी उठवले आणि कांद्याच्या वखारीस आग लागल्याचे सांगितले.
९ लाख रुपयांचे नुकसान
ही माहिती समजताच जगताप यांनी वखारीकडे धाव घेतली. त्यांनी पाहिले तेव्हा उसाचे पाचट आणि कांद्यास आग लागली होती. आग आटोक्यात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र आग आटोक्यात आली नाही. या आगीत नाना जगताप यांचा ५५ टन कांदा जळाला. त्यामुळे जवळपास ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - 'आई आणि डॉक्टर दोन्ही जबाबदारी सांभाळणे तारेवरची कसरत'
हेही वाचा - आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद दिले तसेच बहुजनांचे सुद्धा पालकत्व स्वीकारा - गोपीचंद पडळकर