पुणे - जिल्ह्यातील शिरूर येथील निवारा केंद्रातील ३८ मजुरांची स्वगृही रवानगी करण्यात आली आहे. हे सर्व मजूर वाशिम जिल्ह्यातील असून ते पायी चालत त्यांच्या गावाकडे निघाले असता त्यांना निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते.
लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे अनेकांनी पायी प्रवास करत घरचा रस्ता धरला. मजुरांचे हे स्थलांतर रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय करण्यात येत आहेत. शिरुर तालुक्यात तीन ठिकाणी निवारागृहे स्थापन करण्यात आले. याठिकाणी वाशिमववरून पायी गावाला निघालेल्या ३८ मजुरांना १ एप्रिलाला थांबविण्यात आले होते. त्यांची भिमा-कोरेगाव येथे राहण्याची, जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी देखील केली होती.
दरम्यान, राज्य शासनाने स्थलांरीत मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर वाशिम जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेवून ३८ मजुरांना त्यांच्या मूळगावी पोहोचविण्यात आले.