पुणे- पिंपरीतील जम्बो कोविड सेंटरमधून तडकाफडकी 32 परिचारिकांना कंत्राटदाराने नोकरीवरून काढून टाकल्याचे प्रकरण समोर आले आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी पाहून नेहरूनगर येथे महानगर पालिकेने जम्बो कोविड सेंटर उभारले आहे. तिथे अनेक जणांना कंत्राटी पद्धतीवर नोकरी मिळाली. गेल्या एक महिन्यापासून दिवसरात्र कोरोना बाधितांची सेवा करणाऱ्या परिचारिकांना मात्र अचानक काढून टाकण्यात आल्याने त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. 30 हजार रूपये पगार सांगून जेमतेम 4- 5 हजार रुपये त्यांना देण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाईल तसेच कोणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल अशी माहिती 'ईटीव्ही भारत' ला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
पिंपरीतील नेहरूनगरमध्ये महानगर पालिकेच्या वतीने मगर स्टेडियम येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन पार पडले होते. दरम्यान, एक महिन्यापूर्वी विदर्भातील 32 परिचारिका जम्बो कोविड सेंटरमध्ये कंत्राट पद्धतीने कामावर रुजू झाल्या होत्या. त्यांना 30 हजार मासिक पगार आणि तीन महिन्याचे नियुक्ती पत्र देण्यात आले होते, अशी माहिती परिचारिका सिंधी वासमवार यांनी दिली आहे.
सप्टेंबर महिन्यात कोविड सेंटरमध्ये असलेल्या आयसीयू विभागात कोरोना बाधित रुग्णांची 32 परिचरिकांनी 12 तास सेवा करुन कर्तव्य बजावलं आहे. परंतु, कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे सांगून अचानक तडकाफडकी त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. हे प्रकरण मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी समोर आणले आहे. परंतु, परिचरिकांनी सांगितल्या प्रमाणे पूर्ण पगार न देता केवळ 4 ते 5 हजार दिले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली असून राहात असलेले ठिकाण तीन दिवसात सोडण्याचे फर्मान संबंधित परिचारिका यांना कंत्राटदाराने सांगितले आहे.