पुणे - आंबेगाव तालुक्यातील वळती येथे आज दुपारी ऊसतोड सुरु असताना बिबट्याची ३ बछडे आढळून आली. या बछड्यांना त्यांच्या आईपर्यंत पोहोचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येणार आहे. यापूर्वीही ३ दिवसांपूर्वी याच ठिकाणी २ बछडे आढळून आले होते.
येथील शेतकरी बाळू थोरात यांच्या शेतामध्ये ऊसतोडणी चालू असताना या ठिकाणी हे बछडे आढळले. त्यावेळी वनविभागाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या बछड्यांना टोमॅटो कॅरेटमध्ये ठेवले आणि त्या ठिकाणी नाईट व्हिजन कॅमेरा लावला. बछड्यांची आई या बछड्यांना रात्रीच्या वेळी घेऊन जाते का ? यावर या कॅमेऱ्याची नजर असणार आहे.
मागील काही दिवसांपासून आंबेगाव तालुक्यात ऊसतोड होत असलेल्या ठिकाणी बिबट्यांचे बछडे आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. पकडलेले बिबटे व बछडे पुन्हा याच परिसरात सोडले जात असल्याने बिबट निवारा केंद्र आणि वनविभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.