पिंपरी (पुणे) - पिंपरी-चिंचवड शहरातील 24 जणांना एकाच दिवशी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलं आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली झोन एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी केली आहे. शहरात शांतता राहावी तसेच गुन्हेगारीचं प्रमाण कमी व्हावं, या उद्देशातून ही कारवाई केल्याचं पोलीस उपायुक्त यांनी सांगितलं आहे. दरम्यान, आरोपींवर पोलीस स्मार्ट वॉच ठेवणार असून तडीपार करण्यात आलेल्या आरोपीला लोकेशन आणि फोटो पोलिसांना पाठवावा लागणार आहे. यामुळे त्यांच्यावर पोलिसांचं विशेष लक्ष राहणार आहे.
दोन्ही झोनमधून 93 जण करण्यात आले आहेत तडीपार-यावेळी पोलीस उपायुक्त मंचक म्हणाले की, 32 जणांना तडीपार करण्यात आलं आहे. तर, एकाच दिवशी 24 जणांना तडीपार करण्यात आलं आहे. 2020 मध्ये एकूण 49 जणांना तडीपार करण्यात आलं आहे. दोन्ही झोनमधून एकूण 93 जणांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षकरिता तडीपार केलं गेलं आहे. खुनाचा गुन्हा, खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी प्रकरणातील आरोपींचा यात समावेश आहे.
31 डिसेंबर पासून 2 वर्षांकरिता तडीपार-या गुन्हेगारांना 31 डिसेंबर 2020 पासून 2 वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या कारवाईनुसार निगडी पोलीस स्टेशनमधील 10, पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीतील 2, एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन 5, भोसरी पोलीस स्टेशन आणि चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीतून प्रत्येकी 3, चाकण पोलीस स्टेशन हद्दीतून 1 अशा एकूण 24 सराईत गुन्हेगार तडीपार केले आहेत.
गुंडांवर पोलिसांचा राहणार स्मार्ट वॉच-तडीपार केलेले असतानाही अनेक गुंड शहरात येऊन गुन्हेगारी कृत्य करतात. या वाढत्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तडीपार केलेल्या गुन्हेगारांवर ‘स्मार्ट वॉच’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे तडीपार गुंडाला दररोज लोकेशनसह फोटो पोलिसांना पाठवावा लागणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त यांनी दिली आहे.
हेही वाचा- 31 डिसेंबरला नार्कोटिक्स विभागाची मुंबईत छापेमारी; तिघे ताब्यात