परभणी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून लॉकडाऊन आहे. नागरिकांना सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सामानाच्या खरेदीसाठी सूट देण्यात आली आहे. परंतू, या वेळेत मात्र बाजारपेठेत नागरिकांची अक्षरशः झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. सोशल-डिस्टन्सिंगचा तर अक्षरशः फज्जा उडाला आहे. विशेष म्हणजे या गर्दीत बहुसंख्य नागरिक मास्क न वापरता फिरत आहेत. अशाच नागरीकांना पकडून मनपाने एका दिवसात साडेनऊ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सुरुवातीचा दीड महिना ग्रीनझोनमध्ये असणाऱ्या परभणीत आता कोरोना विषाणूचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. रेडझोनमधून येणाऱ्या नागरिकांमुळे या ठिकाणच्या बाधीत रुग्णांची संख्या 80 वर जाऊन पोहोचली आहे. सध्य परिस्थितीत जिल्ह्यातील 300 हून अधिक संभाव्य रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. त्यामध्ये किती जणांना कोरोना असेल? यावरून सध्या परभणी जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे.
दररोज 100 ते 200 नवीन संभाव्य रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. मात्र, हे होताना दिसून येत नाही. परभणी शहरातील मेडिकल, किराणा आणि भाजीपाल्या सोबतच आता इलेक्ट्रिक, हार्डवेअर आणि इतर काही व्यवसायिक दुकानांना सकाळी 7 ते 2 या वेळेत उघडण्याची सूट जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे. मात्र, याचा परिणाम असा झाला आहे की, परभणी शहरातील शिवाजी चौक, गांधी पार्क, स्टेशन रोड, काळीकमान, सुभाष रोड, जिंतुर रोड, शिवाजी रोड आदी परिसरात नागरिकांची अक्षरश: झुंबड उडत आहे.
सध्या आंब्याचा मौसम आहे, आंबा खरेदीसाठी तर लोकांच्या अक्षरश: उडी पडल्याचे चित्र येथील गांधी पार्कात दिसून येते. याच पार्श्वभूमीवर मनपाच्या अधिकार्यांनी शहरात बेशिस्त फिरणाऱ्या व मास्क न वापरता आढळून येणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
शनिवारी सकाळी 7 ते 2 या वेळेत गांधी पार्क आणि शिवाजी चौक या भागात विना मास्क फिरताना आढळून आलेल्या नागरिकांना प्रत्येकी 100 रुपये याप्रमाणे 9 हजार 400 दंड लावण्यात आला आहे. एकूण 94 लोकांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख यांच्या नियंत्रणाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, स्वच्छता निरिक्षक श्रीकांत कुऱ्हा, कोंडवाडाप्रमुख विनय ठाकूर, रफिक पठाण आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली.