परभणी - जिल्हा रुग्णालयाच्यावतीने कोरोनाबधितांसाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कोरोना हॉस्पिटलमधून जालना आणि औरंगाबाद येथील दोन रूग्ण पळून गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळवले असून पोलीस त्या रुग्णांचा शोध घेत आहेत.
परभणी शहरातील आयटीआयच्या इमारतीत कार्यान्वित केलेल्या कोविड सेंटरमधून कोरोनाचे हे दोन संशयित रूग्ण गुरुवारी रात्री पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कोविड सेंटरमधून रूग्ण पळल्याने पोलीस आणि रुग्णालय प्रशासन प्रचंड गोंधळात आहेत. या कक्षात गुरुवारी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दोन नवीन व्यक्तींची नोंदणी झाली होती. या संशयितांना संसर्गजन्य कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र, त्या दोघांनी कोणाला काहीही न सांगता रुग्णालयातून पलायन केले. ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात येताच या प्रकरणाची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पळून गेलेल्या रुग्णांचा रेल्वे स्थानक व बस स्थानक परिसरात तसेच अन्य ठिकाणी शोध घेण्यात आला. परंतु ते सापडले नाहीत. दरम्यान, डॉक्टरांमार्फत त्या रूग्णांच्या नातेवाईकांना संपर्क केला असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी दिली.
यापूर्वीही कोरोनाबधित कैद्यांनी केले पलायन -
परभणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार अनेक वेळा चव्हाट्यावर आला आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने व्यवस्थापन करणे आवश्यक असताना प्रशासन मात्र तितक्याच हलगर्जीपणाने वागत आहे. यापूर्वी देखील जिल्हा रूग्णालयाच्या अस्थिव्यंग रुग्ण विभागात तयार करण्यात आलेल्या कोरोना हॉस्पिटलमधून जिल्हा कारागृहातील कैदी पळून गेले होते. त्यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने हिंगोली जिल्ह्यातून अटक केली. याशिवाय जिल्हा रुग्णालयाच्या अनेक इमारतींना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्याने एकाचा मृत्यू झाला, तर अनेकांवर गंभीर परिस्थिती ओढवल्याचे प्रकारही अनेक वेळा घडले आहेत.
चौकशी समित्यांचे अहवाल गुलदस्त्यात -
परभणी जिल्हा रुग्णालयातील अनेक भोंगळ कारभाराची चौकशी करण्यासाठी त्या-त्या वेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी चौकशी समिती स्थापन केल्या. यामध्ये आग लागण्याच्या घटना असो, कैदी पळून गेल्याच्या घटना असो किंवा कोरोना बाधितांना वेळेआधी सुट्टी देण्याचे प्रकार असो. तसेच इतर अनेक भोंगळ कारभारा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशी समिती नेमल्या आहे. मात्र, या कुठल्याच समितीचा अहवाल अद्याप प्रशासनाने जाहीर केलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे याबद्दल प्रचंड टीका होऊनही अद्याप कुठल्याच अधिकारी तसेच कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली नाही, हे विशेष.
जिल्हा शल्यचिकित्सकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ -
दरम्यान, नेहमीप्रमाणे या प्रकरणात देखील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. वारंवार संपर्क साधूनही त्यांनी याप्रकरणी कुठलीच माहिती दिली नाही. त्यामुळे रूग्णालय प्रशासनाने यासंबंधी नेमकी काय कारवाई केली, याची माहिती मिळाली नाही.