परभणी - पाथरी येथे सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह जवळपास सव्वाशे मुस्लीम बांधवांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा कार्यक्रम होण्यापूर्वी मज्जाव न करणे आणि वरिष्ठांना न कळविल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी पाथरी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली, तर लागलीच आज मंगळवारी तहसीलदार उत्तम कांगणे आणि नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर यांची देखील महसूल विभागाकडून बदली करण्यात आल्याची चर्चा होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आणि संचारबंदीचा आदेश असतानाही पाथरी शहरात रमजान ईद निमित्ताने सामुदायिक प्रार्थनेकरीता मोठ्या संख्येने जमा झालेल्या नागरिकांना मज्जाव न केल्याबद्दल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या गोष्टीची कल्पना न दिल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. घटनास्थळावरील पाथरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक आणि पाच पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी सोमवारी रात्री पोलीस नियंत्रण कक्षात तात्पुरत्या बदल्या केल्या आहेत.
आज मंगळवारी दुपारी पाथरी येथील तहसीलदार उत्तम कांगणे आणि नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर यांची देखील बदली करण्यात आली. महसूलच्या तहसील प्रशासनाने या सामूहिक नमाज पठण याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका यांच्यावर ठेवत, बदल्या केल्या आहेत. ज्यामध्ये उत्तम कांबळे यांची बदली किनवटचे तहसीलदार म्हणून करण्यात आली आहे. तर पाथरीच्या तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक अधिकारी म्हणून असणारे प्रशांत सुपेकर यांची परभणीत शिस्तभंग विषयक कारवाईचा प्रस्ताव ठेवून बदली करण्यात आली आहे. त्यांना परभणी पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक म्हणून नियुक्ती दिल्याचे पत्र आज जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी दिले आहे.