परभणी - बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची अवाक होत आहे. त्यामुळे येलदरी धरणाचे 6 दरवाजे उघण्यात आले असून 12 हजार 600 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीच्या पात्रात केल्या जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने खडकपूर्णा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे पूर्णा नदीच्या माध्यमातून येलदरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची अवाक सुरू झाली आहे. त्यामुळे येलदरी धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊ लागली आहे. ज्यामुळे जलाशयात 99 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाला. पाण्याची प्रचंड आवक होत असल्याने प्रशासनाने बुधवारी धरणाचे 3 दरवाजे उघडले होते. त्यानंतर 1 दरवाजा उघण्यात आला होता. त्यानंतरही पाण्याची आवक वाढत असल्याने रविवारी मध्यरात्री आणखी 3 व 8 क्रमांकाचे दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग केल्या जात आहे.
सद्यस्थितीत एकूण 1,3,5,6,8 व 10 क्रमांकांचे असे 6 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून नदीपात्रात 12 हजार 600 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन अभियंत्यांनी केले आहे. दरम्यान, येलदरी जलाशयाच्या 2 संचाच्या माध्यमातून मागील आठवड्यात बुधवारपासून जलविद्युतनिर्मिती प्रकल्पात पाणी सोडण्यात येत आहे. ज्यातून दोन संचाच्या माध्यमातून 22 मेगाव्हॅट वीज निर्मिती करण्यात सुरुवात करण्यात आली आहे.
जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण हे तब्बल 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले आहे. मातीत बांधण्यात आलेले हे धरण आजही भक्कम स्थितीत उभे आहे. या धरणावर वीज निर्मिती प्रकल्प असून गेल्या अनेक वर्षात पाण्याची आवक नसल्याने गत वर्षीपर्यंत ही वीजनिर्मिती बंद होती. गेल्या वर्षी देखील धरण 100 टक्के भरल्याने ऑगस्टनंतर काही प्रमाणात वीजनिर्मिती झाली. यंदा मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला वीजनिर्मिती सुरु झाली आहे. येलदरी धरणामुळे परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील लाभ क्षेत्रासनिश्चितच फायदा होणार असून सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे.