परभणी - मोठा समूह करून सापासारख्या चालणाऱ्या 'त्या' विचित्र अळ्या आता परभणीतही आढळल्या आहेत. यापूर्वी औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यात अशा अळ्या आढळून आल्या होत्या. विचित्र अळ्या नेमका काय प्रकार आहे? हे कोडे सुटत नाही तोच, परभणीत देखील अशा प्रकारच्या अळ्या दिसून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
शहरातील विकासनगर भागात राहणाऱ्या रोहिणी आणि उपासना सुधीर निर्मळ यांच्या घरातील अंगणामध्ये विचित्र अळ्या आज सकाळी दिसून आल्या. पाहता पाहता प्रचंड संख्येने अळ्यांचा समूह तयार झाला आणि अळ्या सापासारख्या चालू लागल्या. हा विचित्र प्रकार पाहून घरातील लोक भयभीत झाले. अळ्यांना पाहण्यासाठी संबंधीत ठिकाणी आजूबाजूचे नागरिक, महिला मोठ्या संख्येने जमा झाले होते. नेमका काय प्रकार आहे? अशी एकच चर्चा सुरू होती. काही कालावधीनंतर अळ्यांना कचराकुंडीमध्ये फेकून देण्यात आले.
दरम्यान, गेल्या काही दिवसात औरंगाबाद जिल्ह्यातील वजनापूर येथे या विचित्र अळ्या आढळून आल्या, तर मंगळवारी जळगाव शहरात देखील अश्याच अळ्या पहावयास मिळाल्या.
वातावरणातील बदलामुळे अशा प्रकारच्या अळ्या निर्माण झाल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अत्यंत विचित्र वाटणाऱ्या अनोळखी अळ्यांची नागरिकांना आता भीती वाटू लागली आहे. बागेत, घरात कुठेही या अळ्या आढळत असल्याने त्याचा लहान मुले आणि नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याबद्दल शास्त्रीय माहिती घेऊन याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.