परभणी - येथील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज (मंगळवार) शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. या शक्तिप्रदर्शनात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहणार होते, मात्र ते न आल्याने युवासैनिकांचा हिरमोड झाला.
येथील शनिवार बाजार येथून जोरदार रॅली काढत शिवसेना भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशन रोड मार्गे जिल्हा कचेरीत दाखल झालेल्या या रॅलीत हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते. या रॅलीत उमेदवार संजय जाधव, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, आमदार राहुल पाटील, आमदार मोहन फड, भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, आनंद भरोसे, भाजपच्या महिला नेत्या मेघना बोर्डीकर, माजी आमदार विजय गव्हाणे, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, संपर्कप्रमुख विवेक नावंदर, गंगाप्रसाद आणेराव, सुरेश भुमरे आदींसह शिवसेना भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार संजय जाधव यांनी देशात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याची मोठ्या प्रमाणात जनभावना आहे. त्यासाठी युतीला मतदान करण्याचे आवाहन केले.