परभणी - सध्या राज्यभर नव्हे तर देशभर साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद निर्माण झाला आहे. साईबाबांच्या जन्माचे २९ पुरावे असल्याचे पाथरीकर सांगतात. साईबाबांचे हे जन्मस्थळ नेमकं कसं आणि त्या ठिकाणचं बाबाचं घर कसं आहे? हे आम्ही तुम्हाला याठिकाणी दाखवणार आहोत. येथील पुजारी योगेश इनामदार यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी गिरीराज भगत यांनी...
साईबाबा आणि त्यांच्या आईवडिलांनी प्रत्यक्ष वापरलेले जातं, उखळ आणि इतर काही दगडी वस्तूंसह त्यांच्या देवघरातील मूर्ती देखील याठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्या घरातील पाणी थंड राहण्यासाठी जमिनीत पुरून ठेवलेला माठ सुद्धा याठिकाणी जशाच्या तशा परिस्थितीत आहे. शिवाय साईबाबांचा जन्म झालेल्या खोलीमध्ये गुळाच्या ढेपे इतक्या आकाराची उदीची (अंगारा) ढेप सापडली. तसेच ही ढेप याठिकाणी तांब्याच्या भांड्यामध्ये भरून ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या उदीचा सुगंध हा कापराप्रमाणे येत असल्याचे याठिकाणचे पुजारी योगेश इनामदार सांगतात.
काय आहे साईबाबा जन्मस्थळाचा वाद -
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साईबाबांचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथरी गावाला विकास कामासाठी 100 कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यानंतर शिर्डी येथील ट्रस्ट आणि पाथरी येथील साईसेवा मंडळामध्ये वाद सुरू झाला. तसेच साईबाबांचे जन्मस्थान शिर्डीतच असल्याचे शिर्डीकर सांगतात. मात्र, साईबाबांच्या जन्माचे २९ पुरावे असल्याचा दावा परभणी येथील पाथरीकर करतात. या वादामुळे रविवारपासून शिर्डी येथील मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.