परभणी - जिल्ह्यात दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर 2 आठवड्यापासून परभणीत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामध्ये जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी मागच्या शुक्रवारपासून सकाळी 7 ते दुपारी 2 या काळात जिल्ह्यातील बाजारपेठ सुरू ठेवण्यास मुभा दिली होती. मात्र, आज रविवारी संध्याकाळी पुन्हा नव्याने आदेश काढण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार आता सायंकाळी 6 वाजेपर्यंत बाजारपेठ खुली राहणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना आणखी थोडासा दिलासा मिळाला आहे.
परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विविध उपाययोजना राबवत जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, यास व्यापारी आणि विविध संघटनांकडून जोरदार विरोध होत आहे. त्यातच जिंतूर येथील एका व्यापाऱ्याने लॉकडाऊनला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून होणारा विरोध प्रशासनाच्या लक्षात आला. शिवाय पालकमंत्री नवाब मलिक देखील या लॉकडाऊनच्या विरोधात आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली आहे.
व्यापाऱ्यांच्या विरोधाचा परिणाम
दरम्यान, 2 आठवड्यापूर्वी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यावेळी परभणी जिल्हा व्यापारी महासंघ आणि काही कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी मुगळीकर यांना निवेदन देऊन, आंदोलन केले होते. त्यानंतर सेलू येथील सुमारे पावणे तीनशे व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यांचा अहवाल तब्बल दहा दिवसांनंतर प्राप्त झाला. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरुद्ध सेलूतील व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून विरोध दर्शवला. शिवाय जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी देखील विरोध केला. अनेकांनी पालकमंत्री नवाब मलिक यांना थेट दूरध्वनीवरून विरोध दर्शवला. मात्र असे असले तरी रुग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आपण हे पाऊल उचलत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले. परंतु आता सततच्या संचारबंदीमुळे परभणीतील रहिवाशांची कामे खोळंबली आहेत. अनेकांना संसारोपयोगी साहित्य खरेदीची आवश्यकता असून, या पार्श्वभूमीवर व व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत बाजारपेठा उघड्या ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले आहेत.
रविवारी 522 नवे कोरोनाबाधित, 8 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात आज (रविवारी) तब्बल 522 कोरोनाबाधीत आढळले असून, 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 341 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्य परिस्थितीत 3 हजार 5 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत 443 कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत 16 हजार 273 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 12 हजार 825 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 80 हजार 401 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 63 हजार 515 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आहेत. तर 16 हजार 125 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
हेही वाचा - साताऱ्यात आणखी 688 कोरोनाबाधितांची नोंद, संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन घेणार कडक भूमिका