परभणी - लेबर कार्डचे दोन वर्षांसाठी नूतनीकरण करून देतो, असे सांगत मजुराकडून ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या खाजगी एजंटला शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचून अटक केली. त्याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराने शनिवारी एसीबी कार्यालय परभणी येथे तक्रार दिली होती. यात तक्रारदाराचे लेबर कार्ड २ वर्षांसाठी नूतनीकरण करण्यास खासगी एजंट विकास तुकाराम माने (वय २९, रा. सारंग नगर, खानापूर, परभणी) हा ५०० रूपये लाच मागत असल्याचे म्हटले होते. त्यानुसार तात्काळ दर्गा रोडवरील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयासमोर सापळा रचण्यात आला. या ठिकाणी विकास माने याने पंचांसमक्ष ५०० रुपयांची लाच घेतली असता, त्याला लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले. लाचेची रक्कम त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आली असून शनिवारी सायंकाळी त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक संजय लाटकर, अपर पोलीस अधीक्षक नुरमहंमद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद भारती, जमील जहागिरदार, मिलींद हनुमंते, अनिल कटारे, अनिरुध्द कुलकर्णी, सचिन धबडगे, माणिक चट्टे, सारीका टेहरे, सावित्री दंडवते, रमेश चौधरी यांनी यशस्वी केली.