परभणी - कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही लाट बालकांसाठी धोकादायक असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर परभणीच्या जिल्हा रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र 50 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. रविवारी या कोविड सेंटरचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते झाले. भविष्यात जर संसर्ग वाढला तर नवीन तीनशे बेडच्या कोविड सेंटरचे नियोजन करण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी म्हटले.
प्रत्येक बेडवर ऑक्सिजनची सुविधा
सदर 50 बेडच्या रुग्णालयात एकूण 66 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये 10 'एमबीबीएस' डॉक्टर, 6 बालरोग तज्ज्ञ आणि 50 परिचारिकांचा समावेश आहे. या ठिकाणी 10 व्हेंटिलेटर बेडची सुविधा करण्यात आली असून, संपूर्ण 50 बेडवर ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे.
आणखी 300 बेडच्या स्वतंत्र रुग्णालयाचे नियोजन - मुगळीकर
दरम्यान, तिसर्या लाटेत लहान मुलांमधील संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर हे 50 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी भविष्यात जर बाल रुग्णांची संख्या वाढली तर त्यासाठी परभणी जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीत 300 खाटांचे स्वतंत्र कोरोना बाल रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. गरज पडल्यास ते देखील कार्यान्वित होईल, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिली.
म्यूकरमायकोसिससाठी 200 बेडचा स्वतंत्र कक्ष - मुगळीकर
सध्या म्यूकरमायकोसिस आजाराचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. परभणीत या आजाराचे पाच ते सहा रुग्ण आहेत. या आजाराने बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी 40 खाटांचा स्वतंत्र कक्ष जिल्हा परिषदेच्या इमारतीत तयार करण्यात आला आहे. मात्र या संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत गेला, तर त्यासाठी देखील याच इमारतीत 200 खाटांच्या स्वतंत्र कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे, असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
दुसरा ऑक्सिजन प्रकल्प सुरू
यापूर्वी परभणी जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीत हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणारा एक प्रकल्प सुरू झाला आहे. असाच दुसरा प्रकल्प रविवारी परभणी जिल्हा रुग्णालय परिसरात देखील सुरू करण्यात आला. यावेळी या प्रकल्पाची जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी पाहणी केली. या संदर्भात बोलताना त्यांनी म्हटले की, आणखीन एक प्रकल्प जिल्हा रुग्णालयात सुरू होत असून, त्या माध्यमातून दररोज दीडशे सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, निवासी आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांची उपस्थिती होती.
हेही वाचा - कंगनाच्या बॉडीगार्डला अत्याचार आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटक