परभणी - आपल्या सैन्यांना बेसावधपणे मारणाऱ्या पाकिस्तानी अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राइक केला. मात्र, या कारवाईचा विरोधक पुरावा मागत आहेत. हा पुरावा देण्यासाठी त्यांना बॉम्बला बांधून तिकडे पाठवायचे का? असा टोला महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ रविवारी आयोजित जिंतूर येथील सभेत मुंडे बोलत होत्या.
पंकजा म्हणाल्या, पाकिस्तानातील जनतेमध्ये राष्ट्रवाद आहे. त्या ठिकाणची जनता त्यांच्या सैन्यावर विश्वास ठेवते. मात्र, आपले लोक पुरावा मागतात, आपल्या सैन्यावर अविश्वास दाखवतात. यांना लाज वाटायला हवी, असेही पंकजा म्हणाल्या. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीलाही लक्ष केले.
राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील अनेकांची घरे फोडल्याचा आरोप त्यांनी केला. हे राष्ट्रवादी नसून नुसते वादी आहेत. यांचे नाव घरभेदी पाहिजे, यांनी प्रत्येक घरात आग लावली. ही घरफोडी पार्टी आहे. आमचे घर तर एक उदाहरण आहे. मात्र, त्यांच्या अशा वागण्याने एक-एक माणूस यांच्यापासून दूर जात आहे. मोहिते पाटलांनी यांची आयुष्यभर सेवा केली, त्यांना यांनी दुरावले. याप्रमाणेच विखे-पाटलांच्या बाबतीतही घडले. यांना वाटते, आमच्याच घरातील मुले मोठी झाली पाहिजे. अन्य घरातील मुले मोठी होऊ नयेत, अशी यांची भूमिका असते. याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगले उत्तर दिले आहे. ते म्हणाले 'आम्ही दुसऱ्यांच्या मुलांचेही लाड पुरवतो. अरे आम्ही किती दिवस दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी करायची? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी उमेदवार संजय बंडू जाधव यांच्यासह भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली व्यासपीठावर आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार मोहन फड, माजी आमदार विजय गव्हाणे, रामप्रसाद बोर्डीकर, मेघना बोर्डीकर, अॅड. प्रताप बांगर, भाजप जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, अभय चाटे, सुरेश नागरे, विठ्ठल रबदडे यांची उपस्थिती होती. दरम्यान जिंतूर च्या जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या या सभेला परभणी जिल्ह्यातील नागरिक दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.