परभणी - जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत 166 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले. वाढत्या रूग्णसंख्येमुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पुन्हा कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. आज (शुक्रवार)पासून शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार पुढील आठवडाभर सायंकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे.
4 दिवसात आढळले 664 कोरोनाबाधित रूग्ण -
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात दररोज कोरोनाची दोन अंकी रूग्ण संख्या आढळत आहे. चार दिवसांपासून ही संख्या तीन अंकी झाली आहे. सोमवार ते गुरुवार (18 मार्च) या चार दिवसात 664 कोरोना रूग्णांची नोंद झाली. सोमवारी आणि मंगळवारी या दोन दिवसात 234 नवीन रूग्ण आढळले. दरम्यान, परभणी शहरातील बाधितांची संख्याही 536 वर पोहोचली आहे. सध्या जिल्हात 672 बाधित रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 347 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 9 हजार 937 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 8 हजार 918 व्यक्ती करोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 45 हजार 563 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यातील 1 लाख 35 हजार 46 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले तर, 9 हजार 784 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 593 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले आहेत.
आजपासून संपूर्ण जिल्ह्यात 7 दिवस रात्रीची संचारबंदी -
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शुक्रवारपासून (19 ते 25 मार्च) आठवडाभर दररोज संध्याकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढलेल्या आदेशात संचारबंदीच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या आहेत. या काळात औषधी, दूध या जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य संपूर्ण व्यवहार व बाजारपेठा पूर्णतः बंद राहतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
15 दिवसातच कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ -
मध्यंतरी कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट झाली होती. गेल्या वर्षी म्हणजे जुलै 2020 मध्ये जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 1 हजार 95 इतके रूग्ण होते तर ऑगस्ट महिन्यात हाच आकडा 1 हजार 9 इतका झाला होता. हे दोन महिने सर्वाधिक रुग्णवाढीचे ठरले होते. त्यानंतर हळूहळू कोरोनोचा प्रादुर्भाव कमी होत गेला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला डिसेंबरमध्ये जिल्ह्यात कोरोनाचे 204 रूग्ण होते. 2021च्या जानेवारी महिन्यात 202 व पुढील महिन्यात 342 अशी रूग्णसंख्या वाढत गेली. आता मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या 15 दिवसांतच कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी भर पडली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जनजागृती, अँटीजेन टेस्ट सेंटर, कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मास्क न वापरणार्या नागरिकांवर वेळावेळी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांबरोबरच व्यापार्यांसाठीही विशेष कॅम्प लावून कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. मागील 3 दिवसात 1 हजार 500 व्यापार्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात नागरिकांची जबाबदारी महत्वाची आहे. यासाठी मास्क वापरणे, शारिरिक अंतर पाळणे या नियमांचे पालन कटाक्षाने करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.
हेही वाचा - लॉकडाऊनचा चौथा दिवस; नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद