परभणी - येथून २५ किमीवर असलेल्या गंगाखेड रोडवरील दैठणा या गावी भूमाता महाकाली मातृशक्तीसोबतच लोकसंस्कृतीचा एक अनोखा सोहळा रंगणार आहे. येत्या पोर्णिमेला अर्थात मंगळवारी १९ फेब्रुवारीला हा सोहळा होणार आहे. यावेळी पंचक्रोशीतीलच भाविकांसोबत मुंबई, ठाणे, पुण्यासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील भाविकदेखील हजेरी लावणार आहेत.
परंपरा चालवून सर्वसामान्य जनतेत आपली एक वेगळी छाप निर्माण करणाऱ्या थोर गुरू विठामाय यांची १९ फेब्रुवारी पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही मातृशक्तीचा मोठा उत्सव साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला मुंबई, ठाणेसह आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यात पसरलेले विठामायचे शिष्यगण, मातृशक्तीचा वारसा चालवणाऱ्या देवकरीन, देवकर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी (१९ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता दैठण्यातील विठामायच्या समाधी स्थानावर या मातृशक्तीच्या सोहळ्याला सुरूवात होईल. यात दैठणा गावातील ग्रामस्थांसोबत विविध जिल्ह्यातून आलेले वाजंत्री यांच्याकडून आरती आणि पुजेचा मोठा गजर केला जाणार असून हा सोहळा दिवसभर चालणार आहे. तर सायंकाळी दैठणा गावात असलेल्या विठामाय यांची मुलगी आणि जेष्ठ देवकरीन म्हणून ओळख असलेल्या रूकमामाय यांनी उभारलेल्या महाकाली मंदीराजवळ सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरूवात होईल. हा कार्यक्रम रात्रभर चालणार आहे. यात अनेक ठिकाणाहून येणारे देवीचे महिला भक्त आपल्या गुरू विठामाय यांच्यावर लोकगीते, स्मरणगीते, आठवणीपर रचण्यात आलेली गाणी गाणार आहेत.
सुमारे दिडशे वर्षापासून माली-पाटील म्हणून ओळख आलेल्या विठामाय कच्छवे यांच्या कुटुंबात या चंद्रपूर येथील महाकालीची (धुरपतामाय) मोठी परंपरा चालवली जाते. विठामाय यांनी निर्माण केलेल्या मातृशक्तीच्या परंपरेला केवळ राज्यातच नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेश याही राज्यात मोठ्या प्रमाणात शिष्यगण पसरला आहे. विठामाय यांनी निर्माण केलेल्या परंपरेची आणि विठामायच्या आठवणींची शेकडो लोकगीते ही भक्त मंडळी गातात.