परभणी - जिल्ह्यातील सोनपेठ शिवारात असलेल्या निळा येथील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन पाहणी केली. आज (मंगळवारी) सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या या पाहणी कार्यक्रमात त्यांनी बाधित शेतकऱ्यांशीदेखील संवाद साधला.
परभणी जिल्ह्यातील सुमारे 76 हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज सायंकाळी देवेंद्र फडणवीस हे आपल्या ताफ्यासह पाहणीसाठी आले होते. यावेळी त्यांनी निळा शिवारातील शेतकरी विनायक कुलकर्णी यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कापसाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या ठिकाणच्या इतर शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला. शेतकऱ्यांचे नेमके कोणत्या पिकांचे नुकसान झाले, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे कापसासह सोयाबीनचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती त्यांना दिली. गंगाखेड-परळी रोडवर असलेल्या या शेतातील बांधावर जाऊन फडणवीस यांनी ही पाहणी केली.
हेही वाचा - खूशखबर..! मनसेच्या मागणीनंतर अमेझॉन, फ्लिपकार्टवर मराठी भाषा उपलब्ध होणार
यावेळी त्यांनी 'आम्ही शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सरकारला जाब विचारून भरपाई मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांचा खोटारडेपणा त्यांच्यापुढे उघडा पाडू आणि शेतकऱ्यांना कशी मदत मिळेल, यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मागच्या पाहणी दौर्यात 25 हजार व 50 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी केली होती. तीच मागणी त्यांनी आता या वेळी पूर्ण करावी, या साठी आता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत, असे फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले. त्यांच्यासोबत परभणी जिल्ह्यातील आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, आनंद भरोसे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.