परभणी - 'एकच नारा सातबारा कोरा' अशा घोषणा देत परभणीत मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयापुढे 11 ब्राह्मणांचे यज्ञ करून उपहासात्मक आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. शिवाय मुख्यमंत्र्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याची सुदबुद्धी द्यावी, अशी प्रार्थनाही करण्यात आली. शासनाने कर्जमाफीच्या संदर्भात काढलेल्या जीआरची या यज्ञात आहुती देऊन निषेध नोंदवण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी केवळ प्रसिध्दी न करता शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी लावून धरली होती. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना जाहिर केली. पण या कर्जमाफीत संपुर्ण कर्जमुक्ती करण्याऐवजी दिड लाख रूपायांची मर्यादा ठेवली. त्या मर्यादपर्यंत लाभ देण्यासाठीही आजपर्यंत २१ वेळेपेक्षा अधिक जीआर काढण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांसह बँकाही गोंधळून गेल्या आहेत. राज्यातील शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाने ग्रासला आहे. राज्याचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग पुर परिस्थितीने बेजार आहे. नापिकी व कर्जाच्या विळख्यात सापडलेला शेतकरी दररोज आत्महत्येला कवटाळत आहेत. शिवाय बापाचा शेती व्यवसाय घाट्याचा आहे. त्यामुळे नोकरी किंवा इतर व्यवसायात जाऊ पाहणारा शेतकऱ्याचा मुलगादेखील बेरोजगार झाला आहे. राज्यातील जनता बेजार असताना मुख्यमंत्री मात्र शासकीय इतमामात प्रचार यात्रा करत फिरत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
मात्र, आता मुख्यमंत्र्याना सुदबुद्धी यावी व त्यांनी शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्तीसह शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, या करिता श्रावण मासानिमित्य स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली ११ ब्रम्हणांचा महायज्ञ करण्यात आल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. प्रकाश पोपळे यांनी सांगितले. आंदोलनात महिला प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटिंग, डिगांबर पवार, मुंजाभाऊ लोंढे, भगवान शिंदे, रामभाऊ आवरगंड, शेख जाफर, केशव आरमाळ, उस्मान पठाण, माधव निवळ, अच्युत रसाळ, डिगांबर खटिंग, अनंत कदम, अजय पवार, बालासाहेब आळणे, माऊली मोहिते आणि सुभाष माने आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.